रत्नागिरी : कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन रेशन दुकानदारांना थंबने पॉस मशीनद्वारे धान्य वाटप करण्यास संघटनेतर्फे मागणी करण्यात आली होती. मात्र, ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही तसेच अन्य मागण्यादेखील करण्यात आल्या होत्या. त्याकडे देखील शासनाने दुर्लक्ष केले आहे. रेशन दुकानदारांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून सोयीसुविधा उपलब्ध करण्यास शासनाला नेमकी कोणती अडचण आहे. रेशन दुकानदारांनी नेमके करायचे काय? असा संतप्त प्रश्न रत्नागिरी जिल्हा रेशनिंग दुकानदार केरोसिन मालक-चालक संघटनेचे अध्यक्ष अशोक कदम यांनी उपस्थित केला आहे. अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे.
या निवेदनात असे नमूद केले आहे की, रत्नागिरी जिल्हा कोरोनाचा ‘रेड झोन’ म्हणून घोषित केलेला आहे. सर्व तालुक्यांतून ग्रामीण भागामध्ये व शहरी भागामध्ये कोरोना रुग्ण आजही वाढत आहेत. बऱ्याचशा ठिकाणी कंटेंनमेंट झोनदेखील केलेले आहेत. अशा परिस्थितीत जो ग्राहक कोरोना रुग्ण म्हणून घोषित केलेला असेल त्याला अन्न पुरवठा कायद्यान्वये धान्य देणे बंधनकारक असताना धान्य दुकानदाराकडून त्याचा अंगठा घेऊन त्याला धान्य वितरण केल्यास धान्य दुकानदार कोरोनाबाधित होईल व इतर ग्राहकांना त्याचा त्रास होईल. त्यामुळे जिल्हा संघटनेने धान्य दुकानदारांच्या अंगठ्याद्वारे धान्य वाटप करण्याची मागणी केली होती. ती अद्याप मान्य न झाल्यामुळे निदान जिथे कंटेन्मेट झोन आहे किंवा कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांना धान्य वाटप करण्यासाठी ऑफलाईन परवानगी मिळावी व ते वाटप नॉमिनीच्या अंगठ्याने अधिकृत करण्यात यावे, अशी मागणी यात केली आहे. जिल्ह्यामध्ये वितरण व्यवस्था हाताळताना धान्य दुकानदार कोरोनाबाधित होऊन अडचणीत आलेत. दुर्घटना घडल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील, असा इशाराही या निवेदनात दिला आहे.
संघटनेतर्फे रेशन दुकानदारांना विमा संरक्षण, मास्क, हॅण्ड सॅनिटायझर्स, हॅण्डग्लोज अशा विविध मागण्यांची मागणी करूनदेखील त्याची दखल शासनाकडून घेण्यात आलेली नाही. एकंदरीत शासनाला रेशन दुकानदारांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात शासनाला नेमकी कोणती अडचण आहे? असा संतप्त सवाल रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अशोक कदम यांनी उपस्थित केला आहे. याकडे रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, असे आवाहनही केले आहे.