रेल्वे खऱ्या अर्थाने कोकणवासीयांची होईल का? -प्रवाशांकडून विचारला जातोय प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:25 AM2019-04-08T11:25:09+5:302019-04-08T11:27:12+5:30
कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणा अंतर्गत रोहा ते रत्नागिरी दरम्यान खांब उभारण्याचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. त्यापुढील काम देखील युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
कणकवली : कोकणरेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणा अंतर्गत रोहा ते रत्नागिरी दरम्यान खांब उभारण्याचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. त्यापुढील काम देखील युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. यामुळे कोकणरेल्वेचा प्रवास वेगवान होण्याचे स्वप्न दृष्टीपथात येऊ लागले आहे. मात्र, कोकण वासीयांना रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा चांगल्या प्रकारे मिळून खऱ्या अर्थाने रेल्वे कोकणवासीयांची होईल का? असा प्रश्न प्रवाशांमधून विचारला जात आहे.
कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण तसेच विद्युतीकरण करण्यात यावे, अशी दीर्घकाळची मागणी तत्कालीन रेल्वेमंत्री आणि कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू यांच्या कारकार्दीत मार्गी लागली. यासाठी निधीची अर्थ संकल्पामध्ये तरतूद करण्यात आली. रायगडमध्ये या दोन्ही कामांचा शुभारंभ २०१५ मध्ये करण्यात आला.‘कोरे’च्या दुपदरीकरण तसेच विद्युतीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतर २०१६ मध्ये या कामाला खर्या अर्थाने सुरुवात झाली. यातील दुपदरीकरणाचे काम टप्प्या-टप्प्यात करण्यात येत आहे . तर कोकण रेल्वेचे विद्युतीकरण मात्र पूर्ण मार्गाचे करण्यात येत आहे. या कामाची सध्याची स्थिती पाहता रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणासाठी खांब उभारणी जवळपास पूर्ण झाली आहे. याचबरोबर कोकण रेल्वेच्या दक्षिण टोकाकडूनही विद्युतीकरणाचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. विद्युत खांब टाकून पूर्ण झालेल्या रोहा ते रत्नागिरी टप्प्यात लवकरच ओव्हरहेड विद्युत वाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
कोकण रेल्वेचा मार्ग सध्या एकेरी असल्याने माल तसेच प्रवासी गाड्यांचा वाढलेला ताण लक्षात घेऊन मार्गाचे पॅच डबलिंग तसेच जास्त अंतर असलेल्या दोन स्थानकांमध्ये ११ नवीन स्थानकांची निर्मिती करण्यात येत आहे. या नव्या स्थानकांमुळे एकेरी मार्गावर गाड्यांच्या क्रॉसिंगसाठी लागणारा वेळ वाचणार आहे.
कोकण रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर डिझेलवर होणार्या खर्चात मोठी बचत होणार असून, गाड्यांचा वेग वाढण्यास देखील मदत होणार आहे. दरम्यान, या आधी पनवेल ते रोह्यापर्यंत दुपदरीकरण तसेच विद्युतीकरणाचे कामही पूर्णत्त्वाच्या मार्गावर असल्याने कोकण ते मुंबई प्रवासाचे तास कमी होणार आहेत. ही कामे पूर्ण झाल्यावर प्रवाशाना काहीसा दिलासा मिळणार आहे.
मात्र, अजूनही कोकणातील प्रवाशाना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोकण रेल्वेमार्गावरून अनेक रेल्वे गाड्या ये- जा करीत असल्या तरी त्यांना अनेक ठिकाणी थांबा नसल्याने त्या गाड्यांचा म्हणावा तसा फायदा कोकणातील प्रवाशाना होत नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग अथवा रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशाना रेल्वेतील गर्दीतूनच प्रवास करावा लागतो. त्यांचा प्रवास आणखीन सुखकर व्हावा यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने उपाय योजना आखणे आवश्यक आहे.
अनेक रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर शेड नसल्याने प्रवाशाना पावसात तसेच उन्हाळ्यात रेल्वेत चढ - उतार करताना त्रास सहन करावा लागत आहे. कणकवली सारख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर पावसाळ्यात याची प्रचिती प्रवाशाना नेहमीच येत असते. अशा अनेक समस्यांकडे कोकण रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
आमच्या भावनांचा रेल्वेने विचार करावा !
कोकण रेल्वे उभारण्यासाठी अनेक कोकणवासीयांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे या रेल्वेचा जास्तीत जास्त फायदा कोकण वासीयांना व्हावा अशी आमची इच्छा आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे आमच्या भावनांचा रेल्वे प्रशासनाने विचार करावा आणि आपल्या सेवेत सुधारणा करावी.अशी प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी प्रभाकर कदम यांनी व्यक्त केली.