कामगाराचा गेलेला जीव परत येणार आहे का : उदय सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:41 AM2021-04-30T04:41:06+5:302021-04-30T04:41:06+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शहराजवळ असणाऱ्या मिरजोळे ग्रामपंचायत हद्दीतील टी. जे. मरिन कंपनीतील अपघाताची माहिती मिळताच उच्च व ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शहराजवळ असणाऱ्या मिरजोळे ग्रामपंचायत हद्दीतील टी. जे. मरिन कंपनीतील अपघाताची माहिती मिळताच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कोविड नियमांचे उल्लंघन करून कंपनी सुरू कशी ठेवली, असा प्रश्न कंपनी प्रशासनाला सामंत यांनी विचारत धारेवर धरले. कामगाराचा जीव गेलाय तो परत कोण देणार? या कामगारांना भरीव नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, असे कंपनी प्रशासनाला सामंत यांनी ठणकावून सांगितले.
फिश मिल कंपनीमध्ये असणाऱ्या ड्रायरमध्ये अडकून संतोष घवाळी या कामगाराचा मृत्यू झाला असून, सुमित पांचाळ जखमी झाला आहे. अपघाताचे वृत्त समजताच मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयात जाऊन जखमी कामगाराची विचारपूस केली.
या भेटीच्या वेळी नगराध्यक्ष प्रदीप साळवी व शिवसेनेचे राजू तोडणकर, वैभव पाटील उपस्थित होते. कंपनीबाबत अनेक तक्रारींचा पाढा येथे जमलेल्या ग्रामस्थांनी वाचला. प्रचंड दुर्गंधीयुक्त वातावरणात येथील कामगार काम करतात. या कंपनीच्या परिसरातही मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी असते, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दोन दिवसांपूर्वी मिरजोळे ग्रामपंचायतीने या कंपनीला कोविड नियमांचे उल्लंघन करून कंपनी सुरू ठेवल्याबाबत नोटीस दिली होती. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
मृताच्या नातेवाइकांना १० लाख
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कंपनीच्या मालकाची कानउघडणी केल्यानंतर त्यांना जाग आली. कंपनी मालकाने उदय सामंत यांच्याशी संपर्क साधून आपण मृताच्या नातेवाइकांना १० लाखांची मदत देणार असल्याचे सांगितले आहे.