लाेकमत न्यूज नेटवर्क
संदीप बांद्रे
चिपळूण : शहराच्या मध्यवर्ती भागातील चिंचनाका येथील रहिवासी व आतापर्यंतच्या सर्वच महापुरांचे साक्षीदार असलेल्या चितळे कुटुंबानी चक्क दोन दिवस घराच्या आड्यावर बसून काढले. तेथेही महापुराचे पाणी पोहोचल्याने ‘आम्ही जवळून पाहिला मृत्यू’, असा हृदय पिळवटून टाकणारा अनुभव सांगितल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा येईल.
चिपळूण शहराची भौगोलिक रचना एका बशीच्या आकारासारखी आहे. चारही बाजूंनी उंच तर मध्यभागी खोलगट भाग आहे. त्या बशीचे केंद्र म्हणजे चिंचनाका आहे. या चिंचनाक्यात सर्वात पहिले पुराचे पाणी येते. एकदा चिंचनाक्यात पाणी आले, की शहरात पाणी शिरल्याचे शिक्कामोर्तब होते. त्यानंतर प्रशासन व नागरिक पुराचा अंदाज घेऊन उपाययोजना करतात. त्यामुळे पाऊस वाढल्यानंतर सर्वात प्रथम चिंचनाक्यात पाणी भरले आहे का, अशी चौकशी केली जाते. याच चिंचनाक्यात वर्षानुवर्षे राहात असलेल्या चितळे कुटुंबीयांकडे याबाबत अनेकजण नेहमी चौकशी करत असतात. बुधवारी जेव्हा जोरदार पाऊस झाला तेव्हादेखील चितळे कुटुंबीयांना अनेक फोन आले. मात्र, बुधवारी मध्यरात्रीपासून पाण्याची पातळी वाढली आणि सर्वांचा संपर्कच तुटला.
खरे तर चिपळूणचे माजी नगरसेवक कै. मधुकाका चितळे यांचे चिंचनाका येथे कौलारू बैठ्या पद्धतीचे घर आहे. आता त्यांच्या पश्चात या घरात त्यांचे चिरंजीव प्रभाकर चितळे व विठ्ठल चितळे यांचे कुटुंबीय राहतात. आतापर्यंत या घरात राहूनच त्यांनी अनेकदा पूरपरिस्थितीचा सामना केला आहे. त्याच पद्धतीने हाही पूर निघून जाईल, असे त्यांना वाटले. अगदी पाण्याच्या पातळीत वाढ होऊनही त्यांनी घर सोडले नाही. परंतु, २६ जुलै २००५ची पूररेषा ओलांडल्यानंतर हे कुटुंबीय घाबरून गेले आणि त्यांनी घरातील साहित्याचा विचार न करता गुरुवारी रात्रीच थेट आड्यावर जाऊन बसले. परंतु, शुक्रवारी रात्री १ वाजता आणखी चार फुटाने पाणी वाढल्यानंतर मृत्यूसमोर उभा राहावा, असाच काहीसा अनुभव या कुटुंबीयांनी घेतला. त्यानंतर सकाळी पाण्याची पातळी कमी होताच घर सोडून विरेश्वर कॉलनी येथील आपल्या नातेवाईकांकडे जाऊन आधार घेतला. घरात कपडे, धान्य सोडाच मीठही शिल्लक राहिले नसल्याचे चितळे कुटुंबीयांनी सांगितले.