रत्नागिरी : बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन दागिने चाेरणाऱ्या सऱ्हाईत महिला गुन्हेगाराला रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. अनघा अनंत जोशी (६३, रा. बसेरा, शिवाजीनगर, रत्नागिरी, सध्या रा. जंगली महाराज रोड, शिवाजीनगर पुणे) असे या महिलेचे नाव आहे.रत्नागिरी शहरातील बसस्थानकात बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चाेरट्याने दागिन्यांसह राेख रक्कमेची पर्स चाेरल्याची घटना घडली हाेती. हा प्रकार शनिवारी (५ फेब्रुवारी) घडला हाेता. या चाेरीप्रकरणी रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. चाेरीच्या अनुषंगाने रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी तात्काळ एक पथक तयार करुन चाेरट्याचा शाेध सुरु केला.
या पथकाकडून चाेरीचा तपास सुरु असतानाच रेकॉर्डवरील महिला गुन्हेगार अनघा अनंत जोशी हिने ही चाेरी केल्याची गाेपनीय माहिती पाेलिसांना मिळाली. त्यानंतर या पथकाने अनघा जोशी हिला १० फेब्रुवारी राेजी ताब्यात घेऊन चाैकशी केली. या चाैकशीत तिच्या ताब्यातून ४५,३५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पाेलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे, पाेलिस हेडकाॅन्स्टेबल विजय आंबेकर, महिला पाेलिस हेडकाॅन्स्टेबल वैष्णवी यादव, पाेलिस काॅन्स्टेबल अतुल कांबळे यांनी केली.