देवरूख नगर पंचायत स्वीकृत नगरसेवकपदी यशवंत गोपाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:32 AM2021-03-26T04:32:18+5:302021-03-26T04:32:18+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क देवरूख : देवरूख नगर पंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी यशवंत गोपाळ यांची गुरुवारी निवड करण्यात आली. संघटना वाढीसाठी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरूख : देवरूख नगर पंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी यशवंत गोपाळ यांची गुरुवारी निवड करण्यात आली. संघटना वाढीसाठी गोपाळ यांनी दिलेल्या योगदानामुळेच त्यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी सांगितले.
चार वर्षांपूर्वी देवरुख नगर पंचायतीची निवडणूक झाली होती. त्यात भाजपने निर्विवाद यश मिळवले होते. यामुळे देवरूख नगर पंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. यात स्वीकृत नगरसेवकपदी कुंदन कुलकर्णी यांची निवड यापूर्वी झाली होती. पक्षाच्या अलिखित नियमाप्रमाणे कुलकर्णी यांचा कालावधी संपल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या रिक्त झालेल्या स्वीकृत नगरसेवकपदी गुरुवारी यशवंत गोपाळ यांची निवड करण्यात आली. भाजपचे संघटन मंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हा प्रभारी प्रसाद लाड, प्रदेश चिटणीस नीलेश राणे, जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी गोपाळ यांची निवड करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांनी ही निवड जाहीर केली. या निवडीनंतर बोलताना यशवंत गोपाळ यांनी पक्षाने दिलेली ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन, असे सांगितले.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, ज्येष्ठ नेते मुकुंद जोशी, नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये, तालुका उपाध्यक्ष अभिजीत शेट्ये, शहराध्यक्ष सुधीर यशवंतराव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.