लाॅकडाऊन संपेपर्यंत करावी लागणार निकालपत्रासाठी प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:52 AM2021-05-05T04:52:07+5:302021-05-05T04:52:07+5:30
रत्नागिरी : कोरोनामुळे पहिली ते अकरावीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, शिक्षण विभागाच्या नियमानुसार ...
रत्नागिरी : कोरोनामुळे पहिली ते अकरावीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, शिक्षण विभागाच्या नियमानुसार वर्षभर विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करून निकाल श्रेणीनुसार जाहीर केला जाणार आहे. सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने लॉकडाऊननंतरच निकालपत्र देण्यात येणार असल्याचे शाळांनी जाहीर केले आहे.
गतवर्षीप्रमाणे यावर्षीही वार्षिक परीक्षा रद्द केल्यामुळे सर्वकष मूल्यमापन पद्धत स्वीकारून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तयार करण्याचे काम शाळेत सुरू आहे. शाळांचे शिक्षक सरसावले असून, काही शाळांनी दि. १० पर्यंत निकाल जाहीर करण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडण्यास बंदी आहे. त्यामुळे पालकांना निकालपत्र आणण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता शाळांना तूर्तास निकालपत्र देणे रद्द केले असून पुढील तारखा व्हॉटसॲपवर घोषित करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
लॉकडाऊनमुळे शाळांमधील शैक्षणिक कामकाज सुरू आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्या तरी विद्यार्थ्यांचे पूर्वीचे मूल्यमापन करून गुणपत्रिका बनविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार शाळांमध्ये गुणपत्रिका तयार करण्याची कामे सुरू आहेत. सलग दोन वर्षे वार्षिक परीक्षा रद्द करण्यात आली असली तरी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनावर आधारित विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे. विद्यार्थ्यांचा श्रेणीनिहाय निकाल व गुणपत्रिका वितरित करण्याची तयारी शाळाशाळांमधून सुरू आहे. निकालासाठी शाळेत गर्दी होऊ नये यासाठी वर्गनिहाय तारखा निश्चित करून पालकांना वेळापत्रक व्हॉटस्ॲपवर पाठविण्यात आले होते. मात्र लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य लोकांना बाहेर पडता येत नसल्यामुळे शाळांनी निकालपत्र वितरण रद्द केले आहे.