देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील गोळवली आमकरवाडी येथील तन्वी श्रीकांत आमकर (१७) या तरुणीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. तन्वी ही दहावीच्या पूर्वपरीक्षेत नापास झाली होती. बोर्डाच्या परीक्षेला आपण पास होऊ का, या टेन्शनमध्ये तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त हाेत आहे.
गोळवली आमकर वाडी येथे राहणारी तन्वी श्रीकांत आमकर ही संगमेश्वर येथील एका हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होती. तिच्या घरामध्ये आई, आजोबा, आजी असून ही मंडळी सकाळी शेतीकामासाठी बाहेर गेली हाेती. घरात काेणी नाही हे पाहून तिने घरातील बेडरूममधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती तन्वीचे चुलते जयंत आमकर यांनी संगमेश्वर पोलीस स्थानकात दिली.
तन्वीचा मृतदेह संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. संगमेश्वर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव करीत आहेत.