रत्नागिरी : येथील जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेने रत्नागिरीतील महिला कोविड रुग्णालय येथे जिल्हाभरातून येणाऱ्या अतिगंभीर रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण उपलब्ध करुन देत सामाजिक बांधिलकी जपली.
लॉकडाऊनमुळे सर्वच हॉटेल्स बंद असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण मिळणे कठीण झाले होेते. याबाबत पतसंस्थेचे चेअरमन परशुराम निवेंडकर यांना आरोग्य व्यवस्थेतील काही मंडळींनी कल्पना दिली व आपण पतसंस्थेमार्फत मदत करावी, असे आवाहन केले होते. त्याप्रमाणे निवेंडकर यांनी पतसंस्थेतील सहकारी संचालकांना याची कल्पना दिली. ही गैरसोय थोडे दिवस का होईना, आपण दूर करू, असा विश्वास संचालकांनी दाखविला. संचालकांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांना भेटून पतसंस्थेकडून भोजनाची व्यवस्था मोफत करण्यात येत असल्याची कल्पना दिली. त्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
रविवारपासून रात्री ८ ते ९ या वेळेत मोफत भोजन व्यवस्था डॉ. फुले यांच्या उपस्थितीत करण्यात आली. ही मोफत जेवणाची व्यवस्था पुढे आठवडाभर सुरू ठेवणार असल्याचे निवेंडकर यांनी सांगितले. रविवारी १०० लोकांनी या मोफत भोजनाचा लाभ घेतला. चेअरमन परशुराम निवेंडकर, माजी चेअरमन नितीन तांबे, दिनेश सिनकर, राजेंद्र रेळेकर, कर्मचारी नेते राजेंद्र जाधव, अभय लाड, नीलेश गिम्हवणेकर, पतसंस्था कर्मचारी संजय साळवी, विरेंद्र कांबळे यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली.