जिल्हा परिषदेचा पशुवैद्यकीय विभाग खिळखिळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:37 AM2021-09-17T04:37:01+5:302021-09-17T04:37:01+5:30
रत्नागिरी : जिल्हा परिषदेत जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांसह पशुवैद्यकीय अधिकारी व इतर विविध पदे गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहेत. त्याचा ...
रत्नागिरी : जिल्हा परिषदेत जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांसह पशुवैद्यकीय अधिकारी व इतर विविध पदे गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहेत. त्याचा परिणाम दैनंदिन कामावर होेत आहे. तसेच जिल्ह्यात पशुपालक असून, जनावरांसाठी पशुवैद्यकीय डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. त्यामुळे पाळीव जनावरांचे प्रमाणही जास्त आहे. परंतु, त्यांना शासनाकडून केले जाणारे लसीकरण वेळेवर होत नसल्याने जनावरांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे. रिक्त पदांमुळे शेतकऱ्यांच्या पशुपालनावर परिणाम हाेत आहे. जिल्ह्यातील ९ पंचायत समित्या तसेच जिल्हा परिषदेत पशुसंवर्धन विभागात अनेक पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम पशुपालनावर होत आहे.
जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख पद असलेले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी हे पदही मागील महिन्यांपासून रिक्त आहे. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. यतीन पुजारी यांची बदली गडचिरोली जिल्ह्यात झाली. त्याचबरोबर पशुधन विकास अधिकारी हे एकमेव पदही गेल्या काही वर्षात भरलेले नाही. पशुधन विकास अधिकारी (विस्तार- पंचायत समिती) - ९ पैकी ७ पदे रिक्त, पशुधन विकास अधिकारी (फिरता प. वै. द. श्रेणी-१) - २ पैकी एकही पद भरलेले नाही. शिवाय पशुधन विकास अधिकारी (प. वै. द. श्रेणी-१)- २० पैकी १६ पदे रिक्त, पशुधन विकास अधिकारी (सधन कुक्कुट विकास गट, चिपळूण)- १ पद असून तेही रिक्त, सहाय्यक पशु विकास अधिकारी- १७ पैकी ७ पदे रिक्त आहेत. पशुधन विकास अधिकाऱ्यांची ७८पैकी ३० पदे, तर व्रणोपचारकाची २० पैकी ९ पदे रिक्त आहेत.
पशुवैद्यकीय विभागातील रिक्त पदांमुळे पशुवैद्यकीय दवाखाने उघडायला डाॅक्टरही नाहीत. त्या ठिकाणी येणाऱ्या पाळीव जनावरांवर उपचार करणे दूरच त्यांना तपासणेही अवघड झाले आहे. याची दखल शासनाने घ्यावी, अशी मागणी पशुपालक, शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे. खासगी डाॅक्टरांकडून अनेक वेळा जनावरे तपासली जात असली तरी त्याचा आर्थिक भुर्दंड पशुपालकांना पडत आहे. त्यामुळे पशुपालक, शेतकरी हैराण झाले आहेत.
पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी-१ ------- २०
पशुवैद्यकीय दवाखाने श्रेेणी-१ फिरता- २
पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी-२ --------- ५१
सधन कुक्कुट विकास गट- १