मायबाप आणि आपलं डोकं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 07:53 AM2018-04-05T07:53:23+5:302018-04-05T07:53:23+5:30

मायबाप आपल्यावर किती प्रेम करतात. लहान असतो तेव्हा तोतरं बोलतात. आपले लाड करत नाचतात, जागतात. गातातही. पण आपण मोठे होतो. आपला मेंदू काम करायला लागतो आणि या मायेच्या नात्यात एकदम अंतरच पडतं.. ते कशामुळे?

Article on relationship between Indian parents and childs | मायबाप आणि आपलं डोकं

मायबाप आणि आपलं डोकं

Next

श्रेणिक नरदे

जगात सगळ्यांची काळजी घेतली जाते. आपल्या जन्माआधी आईच्या पोटात असल्यापासून आपली काळजी घेतली जाते. तेव्हा तर आईबापाने आपलं तोंडही बघितलं नसतं; पण काळजी घेतली जाते. आता अलीकडं तर गर्भसंस्कार वगैरे गोष्टींची दुकानं जोरात चालतात. म्हणजे लेकरू जन्माला येण्याआधी ते बिघडलेलं नसावं, याची काळजी घेतली जाते. त्यापायी ती माउली ठरावीक पदार्थ खाणं, न खाणं, काही ठिकाणी जाणं किंवा जाण्याचं टाळणं, ठरावीक गाणीच ऐकणं, शिव्याशाप, अभद्र बोलणं किंवा ऐकणं बंद करणे इत्यादि गोष्टी ते आईबाप करत असतात.
पण त्यामागे नेमकं काय असतं हे कळत नाही. म्हणजे लेकरू बिघडणार असल्याची खात्रीच असते, की ते संस्कार असणारं असावं ही प्रामाणिकइच्छा? काय माहिती? आपल्याला तरी काय माहिती असणार? ते काहीही असो. पण दिवट्याची काळजी केव्हापासून घेतली जाते हे निदान आपल्या लक्षात आलं असेल.
इंग्रजी लोकांनी, ब्रिटिश लोकांनी आपल्या देशावर राज्य केलं, लुटलं, त्याबद्दल मला राग असणारच; पण त्या लोकांच्या काही गोष्टी आवडतात त्यापैकी काही म्हणजे नोंदी ठेवणं, सर्व्हे करणं. त्यांच्या कोणत्याही कंपन्या बघा त्या आधी लोकांना प्रॉडक्ट वापरायला देऊन त्यावर त्यांची मतं घेऊन ते सगळ्या दृष्टीने योग्य झाला की बाजारपेठेत येतो. नंतरही ते वर्षातून एकदा दोनदा असा सर्व्हे करून कमी-जास्त बघत असतात. बदल करत असतात. भारतीयांत तसं होताना कमी दिसतं. तर माझ्या मनात होतं की गर्भसंस्कार करणारे भारतीय गुरुजी किंवा दुसरी एखादी सर्व्हे कंपनी या लोकांनी गर्भसंस्कार केलेल्या लेकराचं पुढं आयुष्यात काय झालं? त्याची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, आरोग्याची, कौटुंबिक स्थिती काय झाली याचा एखादा सर्व्हे व्हायला पाहिजे. पण ते आपल्याकडे होताना दिसत नाही. याबाबतीत जे गर्भसंस्कार करतात त्यांनी ही नोंद ठेवली तर बरं होईल. म्हणजे याच्या गर्भसंस्कारावेळी हेहे मंत्र उच्चारलेत; पण ते थोडं कमी पडले, त्यामुळं पुढील वेळी एखादा मंत्र वाढवू म्हणजे हाहा फरक होईल. किंवा या बालकाच्या गर्भसंस्कारावेळी आरोग्यासाठी जास्तच मंत्र उच्चारले आणि त्यामुळे त्याला बळकट आरोग्य मिळून तो मारामाऱ्या करतोय. त्यामुळं पुढील संस्कारावेळी दोन मंत्र कमी कररू, असा व्यावसायिक हेतू ठेवून केलं तर त्याचा फायदा होईल.
कोचिंग क्लासवाले कशी जाहिरात करतात? उलट कोचिंग क्लासवाल्यापेक्षा गर्भसंस्काराला जास्त स्कोप, कारण क्लासवाल्याला मर्यादित विषय गणिताची शिकवणी म्हणजे तो प्राध्यापक किंवा इंजिनेर, नशिबात असलं तर सरकारी अधिकारी. तीन-चार पोस्टच्या पलीकडे क्लासवाल्यांची धाव नाही; पण गर्भसंस्कार या विषयाखाली शेतकरी ते अंतराळवीर अशी सर्वच क्षेत्रं येत असल्याने त्यांनी माझ्या म्हणण्याचा विचार करावा. असो हा विचार ते करतील, आपण आपली काळजी कशी घेतली जाते याचा विचार करू.
आपण पोटातून या पृथ्वीतलावर पाऊल ठेवायच्याच आधी स्टॉपवॉच धरून सेकंदही इकडं-तिकडं होणार नाही अशा पद्धतीने वेळ टिपली जाते. ती नोंद ज्योतिषाकडे जाते, मग आपले पिताश्री राजीखुशीत शिष्टरणीस ठरावीक पैसे देऊन आपलं मुखदर्शन घेतात, आपण भोंगा पसरलेल्या अवस्थेत असतो. नॉर्मली असंच असतंय ते. (मी हे सगळं दुसºयांच्या बाबतीतलं निरीक्षण सांगतोय. मी जन्माला आलो तेव्हा मलाही तुमच्याप्रमाणे काहीच आठवत नाही.)
जन्माला आल्यावर ते हुडकून नाव ठेवतात. चांगला अर्थ असलेली. वीर, सिंह मुलींच्यात राणी प्रत्यय असणाºयांचे आईवडील किती प्रेमळ असतील असंही मला कधी कधी वाटून गेलंय. त्यानंतर आपलं आगमन पृथ्वीतलावर व्हावं यासाठी अनेक किंवा एखाद्या देवाला बोललेला नवस फिटवला जातो. अशा बºयाच गोष्टी होत आपण चालू-बोलू, नाचूबागडू, हसूरडूखेळू लागतो. तसे आईवडील आपल्याबरोबर बालपण अनुभवत तोतलं बोलणे, चालायला येत असताना रांगणे, बाळाला पाठीवर घेऊन फिरवणं असा त्यांचाही मस्त उद्योग चाललेला असतो. आईबापाचं लेकरावरचं प्रेम ही जगातील सुंदर गोष्ट. प्रेम म्हणजे येडं होणं. तसं ते होतात आईवडील. नाहीतर कोण उगचंच तोतलं बोलतं? चालायला येत असताना रांगतंय? नाहीच की! या वयात हे तोतलं बोलणं किंवा पालकाच वागणं जे लेकरू लक्षात ठेवतं ते उद्या आपल्या प्रेयसीबरोबर/सोन्याबरोबर सेम असंच वागतंय. किंवा शक्यता असते.
पुढे आपलं कैक रडगाणं असतं, शाळा ही महत्त्वाची स्टेज येते. काही अपेक्षा असतात. त्या आपण पूर्ण कराव्या अशी त्यांची इच्छा असते. त्यासाठी आईबाप आपल्याला अभ्यास करायला लावतात, आपल्याबरोबर जागतात, लवकर उठतात, क्लास शाळेत पोचवतात, पालक मिटिंगला येतात कधी शाबासकी देतात तर कधी धपाटं लावतात. त्यातून आपला लेकरांचा मेंदू ही विकसित होत असतो.
मात्र हा मेंदू विकसित होतो. डोकं विचार करून, स्वत:च्या मर्जीनं वागायला लागतं तसतसं मायबाप आणि लेकरांतलं अंतर वाढत जातंय. आपल्याला स्वतंत्र विचार करण्याची बुद्धी येते. आणि मग आपल्याला एवढं प्रेम, काळजी माया धाक देऊन आपलं कल्याण चिंतणाºया पालकांत आणि आपल्यात अंतर पडतं. ते काचतं. छळतं. त्रांगडंच होऊन बसतं. ते असं का होतं...
नेमका काय विषय असतो तो आपला..
ते आपण पुढील भागात बघू.. बोलूच एकदा.

shreniknaradesn41@gmail.com

Web Title: Article on relationship between Indian parents and childs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.