आपल्याला जर कोणी विचारलं की वुमन्स डे कधी असतो? तर आपण एका सुरात उत्तर देतो 8 मार्चला वुमन्स डे असतो. परंतु हेच जर आपल्याला कोणी विचारलं की, मेन्स डे कधी असतो? तर आपल्यापैकी कुणालाच ठाऊक नसतं. प्रत्येक वर्षी 19 नोव्हेंबर या दिवशी इंटरनॅशनल मेन्स डे साजरा करण्यात येतो. आज इंटरनॅशनल मेन्स डेच्या निमित्ताने जाणून घेऊयात काही खास क्वालिटीजबाबत ज्यामुळे तुम्ही एक परफेक्ट मॅन बनू शकता.
पझेसिव्ह नाही तर प्रोटेक्टिव्ह बना
साधारणतः पुरूष आपल्या घरातील महिलांबाबत फार पझेसिव्ह असतात. त्यांच्यासाठी प्रोटेक्टिव्ह होण्याऐवजी अनेकदा ते पझेसिव्ह होतात. लक्षात घ्या तुमची पत्नी किंवा बहिणीला तेवढीच मोकळीक द्या जेवढी तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वतःसाठी घेता. त्यांच्यावर विनाकारण बंधनं लादू नका. त्यांची रक्षा करण्याच्या प्रयत्नात तुम्ही त्यांच्या इच्छांवर बंधन आणणं किंवा जास्त पझेसिव्ह होणं टाळा.
जास्त कठोरपणाने वागू नका
अनेकदा जबाबदारीने वागण्याच्या भरात आपण कठोर वागतो. तसे न वागता त्यांच्याशी मित्र म्हणून वागा. त्यामुळे त्या तुमच्याशी अधिक मनमोकळेपणाने वागतील. त्यांना तुमची भिती वाटणार नाही. तुम्ही जर त्यांच्याशी कठोरपणाने वागत असाल तर तुमची त्यांना भिती वाटू लागते. त्या तुम्हाला घाबरून राहतात. परिणामी तुमच्यापासून अनेक गोष्टी लपवून ठेवतात.
आपल्या कुटुंबासाठी वेळ द्या
महिलांना अनेकदा आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी अनेक इच्छा बाजूला ठेवताना पाहिले आहे. परंतु जर पुरूषांनी सुद्धा या गोष्टी लक्षात घेऊन आपल्या कुटूंबाकडे लक्ष दिले तर फायदेशीर होईल. तुमच्या कामातून थोडा वेळ काढा आणि त्यांना बाहेर घेऊन जा. शक्य असेल तर नातेवाईकांसोबत एखादं गेट टू गेदर प्लॅन करा. त्यामुळे तुमच्या प्रति कुटुंबातील लोकांमध्ये आदर वाढेल.
घर सांभाळण्यासाठी तुमच्या पार्टनरची मदत करा
आपल्या समाजात अजूनही घर सांभाळणं आणि मुलांना सांभाळणं ही फक्त महिलांची कामं आहेत असं मानलं जातं. परंतु, जर घर दोघांचही असेल तर त्या जबाबदाऱ्याही दोघांनी समप्रमाणात वाटून घेतल्या पाहिजे. एखाद्या दिवशी वेळ काढून आपल्या पार्टनरला जेवणात मदत करा किंवा घरातील इतर कामांमध्ये हातभार लावा. तुमच्या ऑफिस वर्कसोबतच घरातील इतर जबाबदाऱ्याही सांभाळणं तुमचं कर्तव्य आहे.