पालकत्त्व ही सोपी गोष्ट नाही. मुलांना सांभाळताना, त्यांना वाढवताना आई बाबांना पावलोपावली जाणत्या लोकांची, नातेवाईकांची मदत लागते. त्यांच्या सल्ल्यांची, आधाराची गरज लागते. हे पूर्वीही होतं आणि आताही. पण आता काळ पुढे गेला आहे. त्यामुळे पालकत्त्वाची भूमिका निभावताना मदत जरी लागत असली तरी ती मिळवण्याची जागा आताच्या तरूण आई बाबांनी विशेषत: आयांनी बदलली आहे. मदतीचा, सल्ल्याचा आधार आता त्या इंटरनेटवरून मिळवता आहेत.
भारतात दहा पैकी सात मातांना मुलांना वाढवताना, त्यांचं पालन पोषण करताना तंत्रज्ञानाचा मोठा आधार वाटतो आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपण आपली आईची भूमिका नीट पार पाडू असा त्यांना विश्वास आहे. याबाबत नुकतंच एक सर्वेक्षण करण्यात आलं. त्या सर्वेक्षणानुसार 70 टक्के माता हातातल्या स्मार्ट फोनचा उपयोग आपल्या चिमुकल्यांची काळजी घेण्यासाठी करतात.
स्मार्टफोन या छोट्याशा साधनाचा उपयोग आता मोठ्या प्रमाणात पालकत्त्वासाठीही होतो आहे. 'youGov’ या इंटरनेटवरआधारित मार्केट संशोधन आणि माहिती विश्लेषण संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात 38 टक्के महिलांनी पालकत्त्वात येणाऱ्या अडचणी आणि आव्हानं सोडवण्यासाठी कुटुंब आणि मित्र-मैत्रिणींचा सल्ला घेण्यास प्राधान्य दिलं.
‘पॅरेटिंग अॅप्स’ इंटरनेटवरचं हे साधन भारतातील मातांकडून मोठ्या प्रमाणात वापरलं जात असल्याचं 'youGov’ या संस्थेला आपल्या सर्वेक्षणात आढळून आलं. एकीकडे हा अभ्यास हे देखील प्रामुख्यानं सांगतो की मुलांना सांभाळताना, पालक म्हणून समोर येणाऱ्या अडचणी सोडवताना अजूनही बहुतांश माता मोठ्या प्रमाणात आपल्या कुटुंबावरच अवलंबून राहात आहे. पण याचसाठी इंटरनेटवरील संबंधित विषयाचे ब्लॉग्ज आणि संकेतस्थळं वापरण्याचं तरूण मातांचं प्रमाण वयानं मोठ्या असलेल्या मातांच्या तुलनेत लक्षणीयरित्या वाढत आहे. याबाबतीत तरूण मातांचं हेच प्रमाण 50 टक्के आहे तर वयानं मोठ्या असलेल्या मातांचं प्रमाण 41 टक्के आहे.
सर्वेक्षणासाठी youGov या संस्थेनं एक वर्षाखालील मुलं ते 18 वर्षांच्या मुलांच्या मातांच्या मुलाखती घेतल्या. आणि त्यांचे तरूण आणि वयस्क माता असे दोन गट केले. एक ते तीन वर्ष वयाच्या मुलांच्या मातांना तरूण माता म्हटलं गेलं. सर्वेक्षणात 700 मातांशी बोलून माहिती घेतली गेली.
तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या मुलांबद्दलच्या समस्या सोडवणाऱ्या मातांना तंत्रज्ञानाचा आधार वाटत असला तरी या तंत्रज्ञानाबद्दलची भीतीसुध्दा त्यांच्या मनात आहे. आताच्या डिजिटल युगात आपली मुलं सायबर बुलिंग सारख्या आव्हानांना कशी तोंड देतील? हे आव्हान ते पार करतील की त्यास बळी पडतील याबद्दलची भीती सर्वेक्षणात सहभागी झालेल्या तरूण मातांपैकी तीन चतुर्थांश मातांना वाटत असल्याची माहिती या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.