सोशल मीडीयात आपलं नातं जगजाहीर करायचं. एकत्र फोटो टाकायचे, मॅडली इन लव्ह म्हणायचं आणि सतत पीडीए अर्थात पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन करत रहायचं हा अनेकांचा/अनेकींचा छंद. पण हा छंद कितीही लाडीक वाटत असला तरी आपल्या नात्याला घातक नाही ना हे जरा तपासून पहा.लोकांना आपल्या नात्यातला रोमान्स, त्यातलं प्रेम, आपलं कसं भारी चाललंय हे दाखवण्याच्या नादात आपण आपल्या नात्यापेक्षा चमकोगीरीलाच फार महत्व देतोय का याचंही भान अनेकदा सुटताना दिसतं.तसं आपलं होतंय का? लोकांच्या लाइक्स आणि कमेण्टसाठी आपण नात्याचं प्रदर्शन मांडतोय का हे जरा स्वतर्लाच विचारायला हवं.तर त्याची ही एक छोटीशी टेस्ट. हे आपण करत नाही ना, हे एकदा तपासून पाहिलेलं बरं.1) आपल्याला वाटतं म्हणून आपले इंटिमेट किंवा बाहेर फिरायला गेले असतानाचे, जेवणाचे, फिरण्याचे फोटो जोडीदाराला न विचारता समाजमाध्यमांत टाकू नये. कदाचित त्याला ते ऑकवर्ड वाटत असेल.2) असे फोटो सतत टाकू नये. आपलं आयुष्य कसं हॅपनिंग आहे यापलिकडे दुसरं काहीच आपण त्यातून जगाला दाखवत नाही.3) जे प्रेमाचं ते भांडणाचं. भांडणं झालं म्हणून सूचक फोटो, कोट्स, शायरी फेसबूकवर टाकून इतरांना पिडू नये, सहानुभूती मागू नये. भांडणं मिटलं हे ही जगजाहीर सांगणं बरं नव्हे.4) आपलं नातं आपल्या जगण्याचा, अनुभवाचा भाग व्हावं. त्यातले खासगी क्षण जगजाहीर करुन आपण त्याला रोमान्स घालवतो, लोकांना चघळायला एक विषय देतो हे विसरू नये.5) आपल्याला जोडीदारानं एखादं गिफ्ट दिलं, किंवा आपण त्याला दिलं तर ते, त्याचे फोटो इतरांना दाखवून आपण काय साधतो?
6) नात्याचे बारीकसारीक तपशिल अगदी काय जेवले, हसले, बोलले इत्यादी इतरांना आपण का सांगत सुटतो? त्याची गरज नसते. आणि ते सतत केलं तर आपल्या नात्यातही फार चार्म उरेलच असं नाही.