जेव्हा पार्टनर आणि तुमच्यात योग्यप्रकारे संवाद होतो आणि दोघांचा एकमेकांवर विश्वास असतो तोपर्यंत नातं सुरळीत असतं. पण तसं नसेल तर हे नातं तुमच्यासाठी त्रासदायक ठरु शकतं. काही लोकांना असं वाटत असतं की, त्यांचा आपल्या पार्टनरवर पूर्ण हक्क आहे आणि ते पार्टनरवर स्वामित्व थोपवू पाहतात. तर काही लोक हे आपल्या पार्टनरच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. असा जोडीदार असणे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाहीये. खालील बाबींवर लक्ष द्या आणि तुमचा पार्टनर पझेसिव्ह तर नाहीये ना हे जाणून घ्या.
१) तो तुमच्यावर नजर ठेवतो?
तुमचा पार्टनर तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष देत असेल, तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तुम्ही काय शेअर करता, कुणाला फोन करता, कुणाला मेसेज करता यावर लक्ष ठेवत असेल तर हे जरा जास्तच होतंय, असं तुम्हाला वाटत नाही का? अशाप्रकारे तुम्हा दोघांचंही जगणं कठिण होऊ शकतं. त्याचं अशाप्रकारे वागणं म्हणजे तुमच्यावरील अविश्वासच आहे. वेळीच यावर विचार केलेला बरा.
२) तुमच्यावर कंट्रोल
त्याला कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचं असतं. जर तो तुमच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करत असेल तर तो पझेसिव्ह आहे हे समजा. अशा लोकांना हेही जाणून घ्यायचं असतं की, तुम्ही कधी, कुणाला आणि कुठे भेटणार आहात. तुम्हाला थोडा उशीर झाला तरी अशांना ते पसंत नसतं. अशावेळी प्रेमाच्या या नात्यात किती विश्वास राहिलाय किंवा नाही याचा विचार तुम्हीच करायला हवा.
३) तुमच्यावर जळतो
जर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये किंवा परिवारातील सदस्यांमध्ये चांगल्याप्रकारे मिसळलात. आणि हे पाहून तो वैतागत असेल किंवा त्याला राग येत असेल तर हे योग्य नाही. कदाचित पुढे जाऊन तुम्हाला तो काय करावं आणि काय करु नये हेही सांगू शकतो. तसेच तो जर तुमच्यावर किंवा तुमच्या यशावर जळत असेल तर अशांपासून दूर राहिलेलेच बरे! त्याच्याशी नातं ठेवून तुम्हाला आनंद कसा मिळणार?
४) तुम्हाला धमकावू शकतो
सनकी लोक हे तुम्हाला पूर्णपणे त्यांच्या हिशोबाने वागवण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही त्यांच्या मनासारखं ऐकलं नाही तर ते तुम्हाला सोडून जाण्याचीही धमकी देऊ शकतात. इतकेच नाही तर ते स्वत:लाही इजा करुन घेऊ शकतात किंवा आत्महत्या करण्याचीही धमकी देऊ शकतात. अशा लोकांवर प्रेम करणं तर दूरच त्यांच्यापासून १० हात दूर रहायला हवं.
५) तुमचे निर्णय तो घेतो
भलेही तुमचा एखादा निर्णय तुमच्या पार्टनरच्या संबंधित नसेल तरीही तो निर्णय घेत असेल तर हे साफ चुकीचं आहे. तुमच्या एखाद्या गोष्टीचा किंवा कामाचा निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हालाच आहे. तुमचा पार्टनर तुम्हाला त्याबाबत सल्ला किंवा त्यांचं मत सांगू शकतो. पण निर्णय तो घेत असेल तर तुमचं जगणं अडचणीत येऊ शकतं.
६) सतत भांडत असेल
भांडण हा प्रेमाचाच भाग आहे असे म्हटले जाते. पण यालाही एक सीमा असायला हवी. उगाच काहीही विनाकारण उकरून काढून भांडणं केलं जात असेल तर दोघांनाही याचा त्रास होईल. काहींना सतत काहीतरी कारण शोधून भांडण्याची सवय असते. अशांसोबत प्रेम कमी आणि त्रास जास्त होतो.