आपण सगळेच जण खोटे बोलतो. अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने खोटे बोलण्याची वेळ आपल्या सर्वांवर येते. खोटे बोलणे फार चुकीचे आहे, असे आपल्याला लहानपणापासूनच शिकवले जाते. लहान मुलांना तर खोटे बोलायचे नाही, नाहीतर देव बाप्पा येऊन कान कापतो, असे अगदी दरडावून सांगण्यात येते. पण लहानपणी खोटे बोलणाऱ्या मुलांचे भविष्य खूप उज्ज्वल असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. लहानपणी खोटे बोलणारी मुले पुढे जाऊन स्मार्ट होतात, अशी माहिती संशोधनातून पुढे आली आहे.
लहानपणी खोटे बोलणारी मुले पुढे फार हुशार होतात. त्यांच्यात खूप आत्मविश्वास असतो. तसेच आपले म्हणणे समोरच्या व्यक्तीला पटवून देण्यात ही मुले पटाईत असतात, अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे. 'आपली मुले लहानपणीच खोटे बोलू लागली, तर पुढे भविष्यात याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, अशी भीती अनेक पालकांच्या मनात असते. मात्र संशोधनानुसार, लहान असताना आणि मोठे झाल्यावर खोटे बोलणाऱ्या मुलांमध्ये मोठा फरक आहे. लहान वयात खोटे बोलणाऱ्या मुलांची ग्रहणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता खूप चांगली असते,' अशी माहिती कॅनडातील टोरंटो विद्यापीठातील संशोधक कॅग ली यांनी दिली.
संशोधनासाठी बालवर्गातील 42 मुलांच्या वर्तणुकीचा अभ्यास
जर्नल ऑफ एक्सपेरिमेंटल चाइल्ड सायकॉलॉजीमध्ये एक संशोधन प्रसिद्ध करण्यात आले. या संशोधनासाठी चीनमध्ये बालवर्गात शिकणाऱ्या 42 मुलांचे निरीक्षण करुन त्यांच्या हालचालींची नोंद ठेवण्यात आली. या मुलांची विभागणी दोन गटांमध्ये करण्यात आली होती. सुरुवातीला या मुलांना खेळांमध्ये गुंतवण्यात आले. त्यानंतर तीन दिवसांनी संशोधकांनी त्यांना एक खेळ खेळण्यास सांगितले. या खेळाचा भाग म्हणून मुलांना खेळणे लपवण्यास सांगण्यात आले. खेळणे लपवण्यात यशस्वी ठरल्यास खेळणे तुम्हाला दिले जाईल, अशी सूचना मुलांना करण्यात आली होती.
एका गटाला खोटे बोलण्याची सूचना
खेळ खेळणाऱ्या एका गटातील मुलांना खेळण्याबद्दल कोणी काही विचारल्यास खोटे बोलायचे, असे सांगण्यात आले. तर दुसऱ्या गटाला अशी कोणतीही सूचना देण्यात आली नाही. अशाप्रकरे खेळ सुरू करण्यात आला आणि त्या मुलांबद्दलची निरिक्षणे नोंदवण्यात आली. यानंतर संशोधकांकडून स्वनियंत्रण, मानसिकता, निर्णय प्रक्रिया आणि समोरच्या व्यक्तीचा उद्देश जाणून त्याबाबतची निरिक्षणे नोंदवण्यात आली. यामध्ये ज्या गटाला खेळणे लपवून खोटे बोलायला सांगितले होते, ती मुले जास्त अॅक्टिव्ह दिसून आली. समोरच्या गटातील मुलांचा हेतू ओळखून ही मुले खोटे बोलली आणि त्यांनी खेळणे व्यवस्थित लपवून ठेवले.
जबरदस्तीने मुलांना खोटे बोलायला शिकवू नये
खोटे बोलल्यामुळे मुले हुशार होतात, हे खरे आहे. मात्र त्यामुळे मुलांना जबरदस्तीने खोटे बोलायला लावू नका, असे संशोधकांनी सांगितले. मुलांना जाणूनबुजून खोटे बोलायला लावल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा संशोधकांनी दिला.