(Image Credit : Daily Mail)
इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे तरुणाई सध्या इंटरनेटच्या जाळ्यात अडकली जात आहे. ऑनलाइन डेटिंग वेबसाईट्स, सोशल मीडिया आणि चॅटींग अॅप्सच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी एकमेकांच्या संपर्कात येत आहेत. अनेकदा असेही पाहिले जाते की, ऑनलाइन संवादातून लोक एकमेकांच्या इतके जवळ येतात की, रिअल लाइफमध्येही भेटण्याचा आणि डेटिंगचा सिलसिला सुरु होतो. अशात मुला-मुलींसाठी हे जाणून घेणं अवघड होतं की, ऑनलाइन चांगल्या दिसणाऱ्या किंवा वागणाऱ्या लोकांमध्ये कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही. त्यामुळे ऑनलाइन नात्यामध्ये सिरिअस होण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे फारच गरजेचे असते.
खासगी माहिती आणि फोटो-व्हिडीओ देणे
ऑनलाइन संवाद साधताना तुम्ही कितीही चांगले मित्र असाल तरी सुद्धा खासगी माहिती शेअर करणे टाळावे. तसेच खाजगी फोटोज किंवा व्हिडीओ सुद्धा शेअर करु नका. समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याने तुम्ही इम्प्रेस झालात याचा अर्थ असा नाही की, तुम्ही तुमची सर्व खाजगी माहिती त्याच्याशी शेअर करावी. इथे खासगी माहितीचा अर्थ तुमच्या घराचा पत्ता, ऑफिस, शाळा किंवा कॉलेजचा पत्ता असाही आहे.
गोड बोलण्याला फसू नका
ऑनलाइन विश्वात प्रत्येक व्यक्ती फार काळजीपूर्वक आपली प्रतिमा समोर ठेवत असतो. त्यामुळे ऑनलाइन संवाद साधताना कुणाचाही हाच प्रयत्न असतो की, समोरची व्यक्ती आपल्यावर इम्प्रेस झाली पाहिजे. कुणाच्या बोलण्यात किती सत्य आणि किती खोटं आहे हे जाणून घेता येत नाही. त्यामुळे ऑनलाइन संवाद साधतांना कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या ऑनलाइन पर्सनॅलिटीनुसार जज करु नका.
प्रश्नांच्या उत्तरावर लक्ष द्या
जेव्हा तुम्ही ऑनलाइन कुणाशी भेटता तेव्हा संवादादरम्यान तो तुमच्याशी काय बोलतो यावर लक्ष द्या. जर काही प्रश्न विचारल्यावर तुम्हाला एकाच प्रश्नांची दोन उत्तरे मिळत असतील तर याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जोपर्यंत समोरच्या व्यक्तीच्या पूर्ण बोलण्याने तुम्ही संतुष्ट होत नाहीत, तोपर्यत त्यावर विश्वास ठेवू नये.
कोणत्याही माहिती विना सिरिअस होऊ नये
ऑनलाइन प्रेमाच्या जाळ्यात अडकणे काही नवीन गोष्ट नाही. पण ही बाब केवळ संवादापुरती ठेवली तरच चांगलं आहे. ऑनलाइन भेटलेल्या व्यक्तीसोबत लग्नाचा विचार करणे थोडं अवघड आहे आणि तेही जेव्हा तुम्ही त्याला किंवा तिला भेटलाच नाहीत. जर तुम्ही ऑनलाइन भेटलेल्या व्यक्तींच्या प्रेमात पडलाही असाल तर त्यांची संपूर्ण माहिती, सगळ्या गोष्टींची खात्री करुन घेतल्यानंतरच नातं पुढे न्यावं.
भेटण्याची घाई
ऑनलाइन चॅट करणे एकावेळी ठिक आहे. अर्थात कुणाशी तुम्हाला कुणाशी बोलणं आवडत असेल तर त्या व्यक्तीला भेटलही पाहिजे. पण यासाठी घाई करु नका. ही घाई तुम्हाला महागात पडू शकते. समोरची व्यक्ती तुम्हाला नुकसान पोहोचवण्याच्या तयारीतही असू शकते. तुमची फसवणूकही होऊ शकते. त्यामुळे समोरची व्यक्ती भेटण्यासाठी फार जास्त दबाव टाकत असेल तर त्याची ही मागणी काही कारणे देऊन टाळू शकता.