रिलेशनशिप, मैत्री आणि जॉब वाचवण्यासाठी 30 सेकंदांची ट्रिक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 05:15 PM2018-11-23T17:15:48+5:302018-11-23T17:42:50+5:30
बऱ्याचदा आपल्या सर्वांकडून वड्याचं तेल वांग्यावर काढलं जातं. मनात नसतानाही अनेकदा समोरची व्यक्ती दुखावली जाईल,अशा पद्धतीनं आपण कळतनकळत तिचा अपमान करतो.
बऱ्याचदा आपल्या सर्वांकडून वड्याचं तेल वांग्यावर काढलं जातं. मनात नसतानाही अनेकदा समोरची व्यक्ती दुखावली जाईल, अशा पद्धतीनं आपण कळतनकळत तिचा अपमान करतो. थोड्या वेळानं आपण असं विक्षिप्त का वागलो?, या विचारानं स्वतःचं डोकं पोखरलं जाते. एकूणच स्वतःच्याच वागणुकीचा आपल्याला पश्चाताप होऊ नये. ही लाजिरवाणी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी तुम्ही 30 सेकंदांची अगदी साधी आणि सोपी ट्रिक आत्मसात करू शकतो. जाणून घेऊया डोक्याचा शॉट कमी करणारी 30 सेकंदांची भन्नाट ट्रिक
1. विचार करुन बोला :
तुमचा पार्टनर कॉल किंवा मेसेजचा रिप्लाय करायला एखाद वेळेस विसरलाच तर तुम्ही त्याच्या/तिच्यावर नको तेवढ्या प्रश्नांचा भडीमार करता. 'तुला माझी किंमतच नाहीय, तू बेजबाबदारच आहे', असे बोलून आपण पार्टनरला आरोपीच्या पिंजऱ्यातच उभे करतो. स्वतःचीच चूक समजल्यानंतर उगाचच राईचा पर्वत केला, हा छोटासा वाद आपण खूप शांतपणे सोडवू शकलो असतो, असे म्हणत स्वतःलाच दोष देऊ लागतो. यामुळे डोकं अधिकच भणभणायला लागते. आपण प्रत्येक जण या परिस्थितीमध्ये वारंवार अडकत असतोच. अशा वेळी व्यक्त होताना, प्रतिक्रिया देताना थोडं विचार करुन बोललात तर नक्कीच कोणत्याही गोष्टीवर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.
2. 30 सेकंदांची ट्रिक
ही भन्नाट ट्रिक केवळ तीन स्टेप्सची आणि तुमचा केवळ 30 सेकंदांचा वेळ घेणारी आहे. एका ठिकाणी बसून तुम्हाला केवळ दीर्घ श्वास घ्यायचा आहे, ज्या काही भावना असतील त्या मान्य करायच्या आहेत आणि स्वतःलाच काही प्रश्न विचारायचे आहेत. स्वतःलाच शांत करण्यासाठी निदान 30 सेकंद तरी तुम्ही देऊ शकताच. हो ना?
3. पहिली स्टेप - दीर्घ श्वास
विचार न करता केवळ चिडचिड करुन स्वतःला त्रास करुन घेण्याऐवजी शांत बसून दीर्घ श्वास घ्या. केवळ श्वासोच्छवासाची प्रक्रिया?, तुम्ही म्हणाल काय बालिशपणा आहे हा. पण हे अजिबात व्यर्थ जाणार नाही. जी छोट्यातील-छोटी गोष्ट तुम्हाला विचलित करते, त्यावर खूप सहजतेनं नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे. शरीरात येणारा ऑक्सिजनचा तुमच्या मेंदूपर्यंत पुरवठा होतो आणि तुम्ही शांतपणे परिस्थितीचे आकलन करू लागता.
4. आपल्या भावना मान्य करा
दुसरी आणि महत्त्वपूर्ण स्टेप म्हणजे स्वतःच्या भावना मान्य करा आणि त्यांना लेबल द्या. नाराजी, अस्वस्थता, राग येणं, दुखावले जाणे किंवा चिडचिड होणे, यातील नेमकी कोणती भावना तुमच्या मनात सध्या आहे, त्याबद्दल आधी स्वतःच जाणून घ्या. स्वतःशीच संवाद साधल्यानंतर कदाचित अशी काही उत्तरं समोर येतील, 'सध्या मी खूप नाराज आहे, किंवा माझी खूपच चिडचिड होतेय'. पण या सर्व गुंतागुंत परिस्थितीत स्वतःला त्रास करुन घ्यायचा नाहीय, असे स्वतःलाच सांगून परिस्थिती शांतपणे हाताळून पूर्वास्थितीत आणायची. यामुळे अतिविचार करण्यावर तुमचा मेंदूतील एक भाग स्वतःच नियंत्रण आणतो आणि भावनांचा अतिरेक होऊ देत नाही.
5. परिस्थिती पुन्हा सांगा
तिसरी स्टेप म्हणजे राग, चिडचिड, संताप ज्या कोणत्या परिस्थितीत आहात, ज्या काही भावना उफाळून येत आहात, त्या परिस्थितीत तेवढ्यापुरते राहून स्वतःलाच काही प्रश्न विचारा :
- ओव्हर रिअॅक्ट करुन मला काही मिळणार आहे?
- केवळ 10 मिनिटांची परिस्थिती दीर्घकाळ राहणार आहे का?, म्हणजे पुढील 5 वर्षे?
- यातून मी काही शिकणार आहे का?
नकारात्मक गोष्टी बाजूला सारुन या प्रश्नांद्वारे परिस्थिती नॉर्मल केली जाऊ शकतो.
6. आणि पुढच्या वेळेस...
पुढील वेळेस जेव्हा पार्टनर, मित्र-मैत्रिणी, सहकारी किंवा कोणाहीसोबत तुमचा वादविवाद, गरमागरम चर्चा झाल्यास...लक्षात ठेवा सुरुवातीस फक्त दीर्घ श्वास घ्यास, आपल्या भावनांना लेबल द्या आणि स्वतःलाच परिस्थितीची जाण करुन द्या. डॉक्याचा शॉट कमी करणारी ही 30 सेकंदांची ट्रिक अंमलात आणल्यास कोणीही दुखावणार तर नाहीच शिवाय तुमच्या डोक्यालाही ताप होणार नाही.