नातं मजबूत करण्याचं गुपित 'या' शब्दांमध्ये दडलंय!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 12:20 PM2019-01-01T12:20:05+5:302019-01-01T12:22:09+5:30
खरंतर नातं टिकवून ठेवण्यासाठी सर्वात जास्त कसरत करावी लागते. कारण दोन एकत्र लोक हे वेगवेगळ्या विचारांचे असतात.
(Image Credit : www.vix.com)
खरंतर नातं टिकवून ठेवण्यासाठी सर्वात जास्त कसरत करावी लागते. कारण दोन एकत्र लोक हे वेगवेगळ्या विचारांचे असतात. त्यांचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. नातं मजबूत ठेवण्यासाठी किंवा ते आणखी घट्ट करण्यासाठी अनेकदा दोघांचं बोलणं किंवा बोलताना ते कोणत्या शब्दांचा वापर करतात हेही महत्त्वाचं असतं. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, 'मी' या शब्दाऐवजी 'आम्ही' या शब्दाचा वापर केल्यास रिलेशनशिपवर फार सकारात्मक प्रभाव पडतो.
जोडीदार जेव्हा 'आम्ही' शब्दाचा वापर करतात तेव्हा यातून दिसतं की, ते आपल्या जोडीदाराच्या व्यवहाराने आणि भावनांनी प्रभावित आहेत. यातून हेही दिसून येतं की, नात्यात स्वातंत्र्य आहे. यात व्यक्ती मीपणा विसरुन दोघांचाही विचार करत असतो.
या रिसर्चमध्ये साधारण ३० अभ्यासांचा सहभाग करण्यात आला होता. ज्यात ५३०० लोकांनी सहभाग घेतला होता. यातून हे समोर आलं की, 'आम्ही', 'आमच्या' आणि 'आपल्या' शब्दांचा वापर करणारे जोडीदार जास्त आनंदी होते. या रिसर्चचे लेखक अलेक्झांडर करन यांनी सांगितले की, 'या सर्व अभ्यासांना समजून घेतल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की, 'आम्ही' या शब्दाचा वापर करुन बोलण्याने नात्यातील स्वातंत्र्य आणि रोमॅंटिक रिलेशन दिसून येतं'.
अभ्यासकांनी यात सहभागी लोकांना संतुष्टी, सकारात्मक-नकारात्मक प्रतिक्रिया, बौद्धिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि दोघे एकमेकांची किती काळजी घेतात या गोष्टींचं निरीक्षण केलं. या शब्दांचा वापर केल्याचा फायदा सर्वच मुद्द्यांवर पुरुष आणि महिलांमध्ये समान बघायला मिळाला.
पण नंतर असा प्रश्न उपस्थित झाला की, आनंदी कपल्स 'आम्ही' या शब्दाचा वापर करुन बोलतात का? आम्ही शब्दाचा वापर करणारे जोडीदार आनंदी राहतात का? यावर अभ्यासकांचं म्हणणं आहे की, दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. जोडीदाराने किंवा स्वत: या शब्दांचा वापर केल्याने विचार करण्याची पद्धत बदलते. ज्याने तुमचं नातं अधिक चांगलं होतं.