- सतीश चाफेकर
प्रत्येक गोष्टीत आत्मस्तुती, मोठेपणा किंवा मीपणा करणारी माणसं आपल्या आजूबाजूला हमखास दिसतात. कार्यक्रम कोणताही असो, मोठेपणा मिळवण्याची संधी ते सोडत नाहीत. कोणत्याही कार्यक्रमात त्यांच्या एकूण हावभाव, चेहऱ्यावर लक्ष ठेवले तर ते जाणवते. इतकेच नाही तर त्यांच्या स्वाक्षऱ्याही त्यांचा मीपणा, मोठेपणा करण्याचा स्वभाव अधोरेखित करतात. त्यांच्या स्वाक्षऱ्या अत्यंत मोठ्या, दणदणीत असतात, परंतु त्यातील रेषा बारीक आणि काहीशा लफ्फेदार असतात. यातूनच लक्षात येते की, आपल्याकडे नसलेल्या गोष्टींचा आव आणण्याचा तो प्रयत्न असतो.
आज वेगळाच विषय जाणून घेऊ तो म्हणजे नार्सिझम, म्हणजेच आत्मप्रतिवाद किंवा आत्मरती, तर कधी नरसंहार असाही घेतला जातो. आपण इथे हा अर्थ आत्मप्रतिवाद किंवा आत्मरती या अर्थाने घेऊ. समाजात प्रत्येक माणूस म्हणजे एक चालतेबोलते युनिट आहे. त्यामध्ये करोडो, अब्जावधी कॉम्पोनंट एकमेकांशी जोडले गेले आहेत. भारतात प्रत्येक माणूस म्हणजे निसर्गाचे यश आहे आणि आपण त्याचा कसा वापर करत आहोत, करतो की नाही, याचेदेखील त्याला भान उरत नाही आणि त्यातून निर्माण होते ती आत्मप्रीती आणि त्यातून आणखी निर्माण होते, ती आत्मरती. त्याला स्वत:शिवाय काहीच दिसू शकत नाही.
अगदी झोपडीतल्या माणसापासून ते विविध राजकारणी मंडळी, मोठे उद्योगपती, कंपन्यांचे प्रमुख, सीईओ कुणालाही हे चुकलेले नाही. समाजात वावरत असताना आपण नेहमीच असे प्रसंग पाहत असतो. त्यातूनच सेल्फी या फोटोची निर्मिती झाली असावी, असेही वाटते. त्याचा अतिरेक आणि मोह टाळता येऊ शकत नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. तर अनेक जण त्या सेल्फीच्या नादात सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागलेत. इतकेच नव्हे तर सेल्फी काढण्याच्या नादात हळूहळू ते प्रवृत्तीने देखील सेल्फिश होऊ लागलेतं, हेसुद्धा नाकारता येत नाही.
आपण देशाबाहेरील काही उदाहरणे घेऊ. देशात खूप उदाहरणे आहेत. आधी एका भारतातील मोठ्या व्यक्तीबद्दल सांगतो. एका समारंभात त्याला बोलावले होते, परंतु त्याला पहिल्या रांगेत न बसवल्यामुळे त्याने जो रोष पत्करला की, तो रोष त्याच्या मनात इतका घट्ट बसला की, राग आणि तो यांचे अतूट नाते झाले. बहुतेक कार्यक्रमांत अनेकांना पहिल्या रांगेत बसायचे असते. परंतु, कुणीतरी स्वत: येऊन नेऊन बसवणे हे त्यांना जास्त रुचते. अशा माणसांचे चेहरे मी नेहमी माझ्या असेल त्या खुर्चीवरून, रांगेमधून बघत असतो आणि त्याचे निरीक्षण करत असतो. अहंकार म्हणा, आत्मरती म्हणा, त्याच्या चेहऱ्यावरून माझ्या निरीक्षण सवयीमुळे ओसंडून वाहताना मला दिसते. परंतु, इतरांना तो चेहरा निर्विकार आणि साधा दिसतो. त्याच्या डोळ्यांचे कोपरे मात्र अशावेळी सहजपणे आजूबाजूचा घडणारा सारा प्रकार टिपत असतात.
त्या प्रकारच्या माणसांच्या स्वाक्षऱ्यांची उदाहरणे तुम्हाला देत आहे, परंतु जाणीवपूर्वक नावे वेगळी देत आहे, उगाच गैरसमज नको. आपण जर यापुढे कुठल्या कार्यक्र माला गेलात, तर निश्चित या दृष्टीने कार्यक्रम बघा. यासाठी तुम्हाला एक तर मागे कोपºयात किंवा मध्ये एका बाजूला बसावे लागेल. जे कोणी मान्यवर असतील, त्यांचे अवलोकन करा. त्यांच्या स्वाक्षऱ्या पाहिल्या तर त्याची सगळी कवचे गळून पडतील. तुमच्यापुढे आणि तुम्हाला खरी माणसे ओळखता येतील.
ही वेगळ्या नार्सिझमची सुरुवात आहे, तो संहार करत नाही, परंतु आपण यांच्यापेक्षा मोठे आहोत, हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. याची खरी धमाल कविसंमेलन किंवा स्थानिक कार्यक्रमात दिसते. जरा नावारूपाला आलेला कवी, लेखक असेल किंवा जवळच्याने मोठेपणा दिल्यामुळे असेल पण तो मध्येच येऊन कार्यक्रमात आपणच किती अनुभवी आणि महत्त्वाचे असे दाखवण्याचा प्रयत्न करतात. खूप सल्ले देत, अनुभव सांगत प्रेक्षकांना बोअर करतात. हल्ली दोन तासांच्या कार्यक्रमात पाहुण्यांची ओळख आणि आभारप्रदर्शन यातच दीड पाऊण-एक तास घेणारेही काही महाभाग दिसतात.
अशा काही ओळखीच्या तर काही अनोळखी सेलिब्रेटी किंवा लोकांच्या स्वाक्षऱ्या पाहा. त्यांच्या स्वाक्षऱ्या अत्यंत मोठ्या, दणदणीत असतातच. काहींच्या कापऱ्या असतील, परंतु बऱ्यापैकी बारीक पण लफ्फेदार. आता शोधली तर अशी माणसे आपल्या आजूबाजूला सहज दिसतील. आपण सतत पुढेपुढे करत राहणे, हा अनेकांच्या आयुष्याचा दिनक्रम होऊन जातो. आज समाजात सगळीकडे मी, मी आणि मीपणा भरून राहिलेला आहे.