आपला चेहरा नितळ, सुंदर असावा असं प्रत्येकीला वाटतं. पण काही ना काही कारणांनी कधी चेहऱ्यावर पुरळ येतात तर कधी चेहरा रुक्ष होतो. कधी सुरकुत्यांमुळे आपण वयस्कर दिसतो तर कधी चेहऱ्यावर अनावश्यक केस वाढल्याने आपल्या सौंदर्यात बाधा येते. बरेचदा हार्मोन्सचे असंतुलन, अनुवंशिकता किंवा अन्य काही कारणांनी चेहऱ्यावर अनावश्यक केस येतात. हनुवटीचा भाग, गालाचा भाग किंवा ओठांच्या वरच्या भागात प्रामुख्याने या केसांची वाढ होते. हे केस विरळ आणि पुसट असतील तर ठिक.
नाहीतर ते दिसू नयेत म्हणून आपल्याला पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंटस कराव्या लागतात. ब्लीच करुन हे केस झाकण्याची एक सोय असते मात्र त्यातील रासायनिक घटकांचा त्वचेला त्रास होण्याची शक्यता असेत. अन्यथा व्हॅक्सिंग, थ्रेडींग करुन हे केस काढावे लागतात. हे झाले तात्पुरते उपाय, कारण काही कालावधीने हे केस पुन्हा दिसायला लागतात. अशावेळी मेकअप करणेही अवघड होते आणि चेहऱ्यावर केस दिसले तर आपल्याला शरमल्यासारखे होत राहते. अशावेळी घरच्या घरी काही सोपा उपाय केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. पाहूया चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून करता येईल असा सोपा उपाय...
१. एका बाऊलमध्ये १ चमचा पिठीसाखर आणि पाव चमचा हळद घ्या.
२. यामध्ये एक चमचा गव्हाचे पीठ किंवा मैदा घाला.
३. यात गुलाबपाणी घालून हे मिश्रण चांगले एकजीव करा.
४. हे मिश्रण चेहऱ्यावर ज्याठिकाणी केस आहेत तिथे २ लेयरमध्ये लावा.
५. अर्धा तास हे मिश्रण चेहऱ्यावर तसेच ठेवा.
६. त्यानंतर चेहरा तसाच न धुता ओल्या नॅपकीनने हळूवारपणे चेहरा साफ करा.
७. चेहरा जोरात न पुसता गोलाकार पुसा आणि साफ करा.
८. यानंतर चेहऱ्यावर मॉईश्चरायजर लावा म्हणजे त्वचा मुलायम राहण्यास मदत होईल.
९. चेहऱ्यावरचे अनावश्यक केस पूर्णपणे निघून जावेत यासाठी आठवड्यातून ३ वेळा हा प्रयोग करा.