त्वचेच्या सौंदर्यासाठी त्वचा स्वच्छ ठेवणं हा महत्त्वाचा नियम आहे. त्वचा स्वच्छ ठेवण्याचं काम स्क्रबद्वारे चांगल्या प्रकारे होतं. पण यासाठी बाहेरचे स्क्रब वापरण्यापेक्षा घरी तयार केलेले स्क्रब फायदेशीर ठरतात. घरगुती स्क्रबमधे बदाम आणि दही यांचा स्क्रब त्वचेसाठी उत्तम आहे. तो घरी बनवून त्वचेवर लावणं हे सहज शक्य काम आहे.
आरोग्याच्या बाबतीत बदामाचं महत्त्वं सर्वांनाच माहित आहे. नुसते बदाम खाणं, किंवा बदाम भिजवून खाणं यामुळे आरोग्यास अनेक फायदे होतात. आरोग्यास फायदेशीर असलेले बदाम त्वचेसाठीही उपयुक्त असतात. बदाम खाण्याने जेवढा फायदा आरोग्यास होतो तितकाच फायदा बदाम चेहेर्यास लावल्यानेही होतो. बदाम-दही स्क्रब हा पर्याय त्वचेस एकाच वेळेस अनेक फायदे मिळवून देतो. चेहेर्यावरची मृत त्वचा काढून टाकणं, त्वचेतील तैल ग्रंथींची निर्मिती नियंत्रित करणं, चेहेर्यावर लवकर सुरकुत्या न पडू देणं असे विविध परिणाम या स्क्रबद्वारे साधले जातात.
बदाम दही स्क्रब
बदाम दही स्क्रब करण्यासाठी खूप जिन्नसांची आवश्यकता नसते. यासाठी केवळ दोन बदाम, एक चमचा दही आणि एक चमचा बदामाचं तेल एवढंच लागतं.
स्क्रब करण्यासाठी सर्वात आधी बदाम वाटून घ्यावेत. त्यासाठी दोन बदाम एका रुमालात ठेवावेत आणि ते बत्त्याने वाटावेत. हवं तर अर्धा कप बदाम मिक्सरमधे वाटून ठेवले तर सतत बदाम कुटण्याचे कष्ट वाचतील. स्क्रबसाठी दही घेताना सूती रुमालानं ते गाळून घ्यावं. त्यामुळे दह्यातील अतिरिक्त पाणी निघून जातं. गाळून उरलेलं चक्क्यासारखं घट्ट दही एका वाटीत घ्यावं. दही चमच्याच्या सहाय्यानं चांगलं कुस्करावं. दही कुस्करल्यानंतर त्यात एक चमचा बदामाचं तेल घालावं. आता दही आणि बदामाचं तेल चांगलं मिसळून घ्यावं.
दही आणि बदामाचं तेल चांगलं एकजीव केलं की आता त्यात कुटलेल्या बदामाची पावडर टाकावी. आता या तिन्ही गोष्टी एकत्र चांगल्या फेटून घ्याव्यात. सर्व जिन्नस एकत्र करुन मग ते फेटलं तर आधीचे र्शम वाचू शकतात असं कोणालाही वाटू शकेल. पण या स्क्रबच्या बाबत प्रत्येक जिन्नस स्वतंत्रच फेटायला हवं. भाजी आमटीची फोडणी करताना जसं सर्व जिन्नस आपण एक एक करुन टाकतो-परततो त्यानं त्या भाजी- आमटीला चव येते तसंच हे स्क्रब करताना प्रत्येक जिन्नस वेगवेगळं फेटलं तर त्याचा अर्क उतरतो. बदामाचा कूट टाकण्याआधी दही आणि बदामचं तेल चांगलं फेटलं तर दह्याच्या प्रत्येक कणात बदामाचं तेल शिरतं.इतक्या निगुतीनं आणि मेहनतीनं तयार केलेला स्क्रब आपल्या त्वचेवर लावल्यानंतर आपल्याला अपेक्षित फायदे मिळवून देतो. या स्क्रबमुळे त्वचेवरील सर्व दूषित घटक दूर होतात आणि त्वचा नितळ-निर्मळ होते.
हा स्क्रब लावण्याआधी सौम्य फेसवॉशद्वारे चेहेरा स्वच्छ धुवावा. यामुळे चेहेर्यावरील धूळ किंवा घाण आणि त्वचेवरचं अतिरिक्त तेल निघून जातं. नंतर चेहेरा रुमालानं टिपून घ्यावा. चेहेरा धुतल्यानंतर जेव्हा आपण स्क्रब करतो तेव्हा यातील दही आणि बदामाचे गुण त्वचेच्या रंध्रातून आत खोलवर पोहोचतात. यामुळे त्वचेचं पोषण होतं. हे स्क्रब केल्यानंतर त्वचेवर जी लगेच चमक येते ती यामुळेच. या स्क्रबमधील दही आणि बदामाचं तेल त्वचेचं पोषण करतात आणि बदामाचा कूट चेहेर्यावरील मृत पेशी काढून टाकतात. मृत पेशी निघून गेल्यानं रंध्रं मोकळी होतात आणि त्यातून दही आणि बदामाच्या तेलाचे तत्त्वं त्वचेच्या खोलवर पोहोचतात.
दही, बदामाचं तेल आणि बदामाचा कूट या मिश्रणानं चार ते पाच मिनिटं चेहेर्याच्या त्वचेचा चांगला मसाज करावा. नंतर चेहेरा पाण्यानं धुवावा. किंवा या मिश्रणाला लेपासारखंही लावता येतं. हा लेप 20 मिनिटं चेहेर्यावर ठेवावा. मग चेहेरा हलक्या हातानं मसाज करत पाण्यानं स्वच्छ करावा. लेप स्वरुपात हा स्क्रब लाव्ल्यास त्वचेची हानी भरुन निघते आणि त्वचेवरील डाग निघून जातात.