Join us  

छोट्या केसांसाठी ३ दिवाळी स्पेशल हेअरस्टाईल्स! करायला सोप्या, दिसायला स्टायलिश आणि सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2021 5:55 PM

केस छोटे असल्यामुळे आता दिवाळीत कशी हेअरस्टाईल करावी, असा प्रश्न पडलाय? मग या काही हेअरस्टाईल बघा आणि दिवाळीत छान स्टायलिश दिसा...

ठळक मुद्देया दिवाली स्पेशल हेअरस्टाईल तुमच्या कोणत्याही ट्रॅडिशनल साडीवर किंवा लेहेंगा, घागरा यासारख्या वेशभुषेवर अगदी परफेक्ट मॅच होतील. 

दिवाळीची खरेदी आता जवळपास संपत आली असेल. कपडे, दागदागिने यांची जुळवाजुळव करण्यात सध्या अनेकजणी बिझी असतील. पण कपडे आणि दागदागिन्यांच्या बरोबरीनेच हेअरस्टाईल कशी करायची याचा विचारही करायला हवा. कारण जोपर्यंत तुम्ही हेअरस्टाईलकडे लक्ष देणार नाही, तोपर्यंत तुमचा लूक परफेक्ट असणार नाही. केस मोठे असले की एकवेळ हेअरस्टाईल कशी करावी, याचं काही टेन्शन नसतं. पण छोट्या केसांबाबत मात्र तो प्रश्न नेहमीच छळतो. म्हणूनच तर छोटे केस असतील, तर अशा प्रकारच्या काही हेअरस्टाईल तुम्ही नक्कीच करू शकता. या दिवाली स्पेशल हेअरस्टाईल तुमच्या कोणत्याही ट्रॅडिशनल साडीवर किंवा लेहेंगा, घागरा यासारख्या वेशभुषेवर अगदी परफेक्ट मॅच होतील. 

photo credit- google

करा या तीन सोप्या हेअरस्टाईल१. फ्लॉवर बनही हेअरस्टाईल करायला अतिशय सोपी आहे आणि दिसायला तेवढीच स्टायलिश. या हेअरस्टाईलचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी साडीपासून ते पार्टी गाऊनपर्यंत कशावरही ही हेअरस्टाईल उठून दिसते. ही हेअरस्टाईल करण्यासाठी सगळ्यात आधी तुमच्या केसांचा एक उंच पोनी बांधा. पुढच्या बाजूने तुम्ही पफ काढू शकता किंवा सगळे केस एका साईडला करून पिनअप करू शकता किंवा अगदी मधून भांग पाडू शकता. तुम्हाला तुमचा पुढचा लूक जसा हवा आहे, तसा करा. फक्त मागच्या बाजूने उंच पोनी बांधा. पोनी बांधण्यासाठी मोठ्या आकाराचे बक्कल वापरा. आता तुमच्या पोनीचे चार भाग करा. वरचा, खालचा आणि आजूबाजूचे दोन अशा पद्धतीने. सगळ्यात आधी वरचा भाग उचला तो बाहेरच्या बाजूने रोल करत डोक्याजवळ न्या. आता डोक्याजवळ ही केसांची गुंडाळी नेली की ती व्यवस्थित पिनअप करा. अशाच पद्धतीने उरलेल्या तिन्ही भागांची गुंडाळी करा आणि ती व्यवस्थित पिनअप करा. चारही गुंडाळ्या पिनअप केल्यानंतर चार पाकळ्यांचं एक मस्त फुल तयार झालेलं दिसेल. आता हेअर स्प्रे मारून हा बन सेट करा. मध्यभागी जे भोक दिसतं त्यामध्ये एखादं फुल खोचा. झाला तुमचा फ्लॉवर बन तयार.

 

२. हाफ क्राऊन ब्रेड हेअरस्टाइल अशा पद्धतीची हेअरस्टाईल करण्यासाठी सगळ्यात आधी समाेरच्या बाजूने मधोमध भांग पाडा. यानंतर सुरुवातीचे काही केस आणि कानाच्या वरील बाजूचे केस उचलून त्यांची वेणी घाला. अशा वेण्या दोन्ही बाजूने घाला आणि त्या मागच्या बाजूला नेऊन पिनअप करा. यानंतर उरलेल्या केसांचा एकतर फ्लॉवर बन घाला किंवा मग उंच पोनीटेल घाला. तुम्ही सप्लिमेंट लावून त्याची वेणी घालून ती एका बाजूने पुढेही घेऊ शकता. साडी किंवा लेहेंगा घातल्यावर ही हेअरस्टाईल जास्त खुलून दिसते. दोन्ही बाजूला ज्या वेण्या घातल्या आहेत, त्यांना मणी किंवा स्टड लावून सजवा.

 

३. सागरवेणी आणि मागे बनअशी हेअरस्टाईल देखील अतिश आकर्षक दिसते. ही हेअरस्टाईल करण्यासाठी सगळ्यात आधी समाेरच्या साईडने सागरवेणी घाला. ही सागरवेणी अर्ध्या भागापेक्षा अधिक घालून झाली की उंच पोनीटेल बांधा आणि त्याचा वर सांगितल्याप्रमाणे फ्लॉवर बन घाला. किंवा समोरच्या साईडने सागरवेणी आणि मागच्या बाजूने नुसताच पोनी टेल अशी हेअरस्टाईल केली तरी ती छान दिसते. असेही नसेल करायचं तर समोरच्या साईडने सागरवेणी घाला अर्ध्यापेक्षा जास्त केस सागरवेणीत कव्हर झाले की एखादे छानसे क्लचर लावून ती वेणी तिथे पॅक करा आणि खालचे केस तसेच मोकळे सोडा. ही हेअरस्टाईल मोती किंवा स्टोन लावून सजवा. साडी, लेहेंगा किंवा पार्टीवेअर गाऊन असे काहीही घातले तरी ही हेअरस्टाईल उठून दिसेल.  

टॅग्स :ब्यूटी टिप्समेकअप टिप्सकेसांची काळजी