थंडीच्या दिवसांत आपली त्वचा एकदम कोरडी आणि रुक्ष होते, त्यामुळे नकळत त्वचेचा ग्लो कमी होतो. थंडीच्या काळात लग्नसराई असल्याने आपल्याला या लग्नांना जायचे असते. इतकेच नाही तर रोजचे ऑफीस किंवा इतर कारणांनीही आपण बाहेर जातो. बाहेर जाताना आपला चेहरा छान ग्लोईंग दिसावा अशी आपली इच्छा असते. अशावेळी बाजारात मिळणारी उत्पादने लावण्यापेक्षा त्वचा ग्लोईंग दिसावी यासाठी जाता येता चेहऱ्याचे काही सोपे व्यायाम केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो (3 Effective Face Exercise for glowing skin and looking young).
यामुळे रुक्षपणा कमी होण्याबरोबरच चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होण्यासही मदत होते. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र काही सोपे फेस योगा सांगतात. हे योगा प्रकार केल्यास चेहऱ्याची त्वचा छान ग्लोईंग दिसण्यास मदत होते. पाहूयात हे फेस योगा प्रकार कोणते आणि ते कसे करायचे...
१. ओठ आणि जबड्याचा व्यायाम
ओठांचा चंबू म्हणजेच पाऊट करायचा आणि श्वास घेऊन तो एका बाजूला वळवायचा. ६ आकडे मोजल्यानंतर मग श्वास सोडत ओठ मध्यभागी घ्यायचे आणि ओठ सरळ करायचे. पुन्हा श्वास घ्यायचा आणि ओठांचा चंबू दुसऱ्या बाजूला वळवायचा. दोन्ही बाजूला हाच व्यायाम प्रकार ६ आकडे होल्ड करण्याचा प्रयत्न करायचा. तसेच एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे असा दोन्ही बाजूला तोंडाचा हा चंबू ४ ते ५ वेळा फिरवायचा.
२. हनुवटी आणि जबड्याचा व्यायाम
हनुवटीला छान आकार यावा यासाठी हनुवटी पुढेमागे करायची. तसेच हनुवटी दोन्ही बाजुने गोलाकार फिरवायची. यामुळे जबड्याचा आणि हनुवटीच्या खालच्या भागाचा चांगला व्यायाम होण्यास मदत होते. हे किमान ४ ते ५ वेळा करायचे.
३. जबडा मोठा करुन व्यायाम करणे
तोंडाचा आ करुन हनुवटी डावीकडे आणि उजवीकडे करायची. हाही व्यायाम आपण जाता येता कधीही करु शकतो. यामुळे चेहऱ्याचे आणि मानेचे स्नायू छान टोन होण्यास मदत होते.