हाच आत्ताचा ट्रेण्ड आहे, मी असेच कपडे घालणार, तेच इन आहेत, तीच फॅशन आहे हे आपण कसं ठरवतो? म्हणजे आपण अमूकच कपडे घातले की स्मार्ट आणि मॉडर्न दिसतो हे कोण ठरवतं? आपण? आपली मतं? आपले मित्र? घरचे? सिनेमे? अजिबात नाही. हे सारं ठरवतात जाहिराती आणि बाजारपेठ. आपल्याही नकळत आपल्या सवयी, आवडीनिवडी, मागण्या, दिसण्याच्या आणि सौंदर्याच्या व्याख्या हे सारं दुसरं कुणीतरी ठरवतं आणि तेच आपलं मत म्हणून आपण ते मिरवतो. चांगल्या गोष्टी जरुर घ्याव्यात पण काही गोष्टी आपल्या तब्येतीला अत्यंत हानीकारक आहेत, हे समजून घेऊन मग फॅशन स्टेटमेण्ट म्हणून ते स्वीकारायचं की नाकारायचं हे ठरवायला हवं.
(Image : Google)
१. स्किनी जिन्सची टाइट फॅशन
आपल्याला स्किन टाइट जिन्स घालता येत नाही याचं अनेकींना दु:ख असतं. कारण बारीक म्हणजेच सुंदर हे बाजारपेठ सांगते. सुदृढ स्त्रिया सुंदर नाही हे कुणीतरी ठरवलेलं खरं मानून चालण्याचा हा ट्रेण्ड. पण तो अनेकींना चकवतो. एकतर बारीक होण्याची होड, त्यात स्किनी जिन्स घालण्याची हौस. मात्र आपल्याकडच्या उष्ण वातावरणात त्या जिन्स घातल्याने अनेक त्वचा विकार होतात. केवळ जिन्स घालणं मॉडर्न आहे आणि आपणही मॉडर्न आहोत, बारीक आहोत म्हणत स्किनी जिन्स घालणं योग्य नाही. त्याचा परिणाम असा की स्किन रॅश, फंगल इन्फेक्शन, घामाचा त्रस आणि पुरळ, चट्टे असे अनेक प्रकार आढळतात.
(Image : Google)
२. हाय हिल्स
हाय हिल्स घातल्यानं टाचा दुखतात, कंबर दुखते. भयंकर वेदना होतात. पाय घसरून पडले तर हाड मोडायची भीती. मात्र तरी आपलं पोश्चर चांगलं दिसतं या एकमेव भावनेपोटी अनेकजणी हाय हिल्स घालतात. आणि त्यातून अनेक आजारांना आमंत्रण देतात.
(Image : Google)
३. लिपस्टिक
लिपस्टिक रोज लावली पाहिजे असं वाटत असेल तर त्यातले चांगले ब्रॅण्ड, आरोग्याला त्रास न होणारे रंग, आणि त्यातले घटक तपासून घेतले पाहिजे.ओठ काळे पडण्याचे, भेगा जाण्याचे त्रास त्यातूनच ओढावतात.