केस खूपच गळतात-त्यामुळे पातळही झालेत, सतत कोंडा होतो, पांढरेही व्हायला लागलेत. अशा समस्या महिला एकमेकींशी शेअर करताना आपण अनेकदा ऐकतो. कधी थंडीमुळे केसांमधली रुक्षता वाढते, फाटे फुटतात तर कधी खूप पातळ झाल्याने टक्कल दिसायला लागते. केसांच्या समस्या या बहुतांशवेळा अनुवंशिक, योग्य प्रकारे काळजी न घेतल्याने किंवा आहारातून शरीराचे पुरेसे पोषण न झाल्याने उद्भवतात. मात्र त्यावर वेळीच उपाय केला नाही तर या समस्या दिवसेंदिवस वाढत जातात. अशावेळी नेमका प्रॉब्लेम लक्षात घेऊन त्यासाठी आपण आहार आणि घरगुती उपायांच्या माध्यमातून ज्या गोष्टी सहज करु शकतो त्या प्रामुख्याने करायला हव्यात. पाहूयात केसांचे चांगले पोषण व्हावे आणि केसगळती, पर्यायाने केस पातळ होणे आटोक्यात यावे यासाठी आहारात असायलाच हवेत असे पदार्थ कोणते (3 Foods To Prevent Hair Fall Diet Tips)...
१. प्रोटीन का महत्त्वाचे?
प्रोटीन म्हणजेच प्रथिने हा आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक असून शरीराचे आणि केसांचा पोषण होण्यासाठी प्रोटीन आणि बायोटीन हे महत्त्वाचे घटक असतात. या दोन्ही घटकांमुळे केसगळती कमी होऊन केसांची चांगली वाढ होण्यास मदत होते. हे दोन्ही घटक अंड्यामध्ये चांगल्या प्रमाणात असल्याने आहारात अंड्यांचा आवर्जून समावेश करावा.
२. कोणत्या भाज्या खायला हव्यात?
पालक ही भाजी आहारात योग्य प्रमाणात असायला हवी. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पालकात व्हिटॅमिन सी, ए, लोह आणि फोलेट जास्त प्रमाणात असते. या घटकांमुळे केसांची वाढ होण्यास मदत होते आणि केसगळतीचे प्रमाणही कमी होते. पालकामध्ये असलेले सिबम त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यास उपयुक्त ठरते आणि त्याचा केसांच्या वाढीसाठी चांगला उपयोग होतो. यासोबत गाजर आणि रताळी यांमुळेही केसांचे गळणे कमी होण्यास चांगली मदत होते. केसांचा पोत सुधारण्यासाठी हे दोन्ही उपयुक्त असते.
३. ओटस आणि आक्रोड खायलाच हवेत
आक्रोड हाडांसाठी चांगले असतात आपल्याला माहित आहे. पण केसांसाठीही सुकामेव्यातील हा महत्त्वाचा घटक उपयुक्त असतो याबाबत आपल्याला माहिती नसते. यामध्ये असलेले बायोटीन, व्हिटॅमिन बी१, बी६ आणि बी ९ , ई, मॅग्नेशियम हे घटक केसांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी अतिशय फायदेशीर असतात. केस लांबसडक आणि जाड होण्यासाठी ओटसचाही उपयोग होतो. यातील झिंक, लोह, ओमेगा ६ फॅटी अॅसिड केसांसाठी खूप चांगले असते.