दसरा म्हटलं की दाराला तोरण, सरस्वतीची आणि शस्त्रांची पूजा हे सगळं ओघाने आलंच. दसऱ्याला आपट्याची पानं, आंब्याची डहाळी आणि झेंडुच्या फुलांचे विशेष महत्त्व असते. घराला तोरण बांधणे, देवाला, गाड्यांना हार करणे आणि सरस्वती पूजनासाठीही झेंडुची फुलं वापरली जातात. रांगोळी म्हणून किंवा डेकोरेशन करण्यासाठीही या फुलांचा वापर केला जातो. या काळात बाजारात केशरी आणि पिवळ्या रंगाची झेंडुची फुलं मोठ्या प्रमाणात उपलब्धही असतात. एकदा या झेंडुच्या फुलांचा वापर करुन झाला की नंतर आपण ती एकतर निर्माल्य म्हणून बाजूला काढून ठेवतो नाहीतर कचऱ्यात टाकतो. पण ही फुलं आरोग्यासाठी विविध प्रकारे अतिशय उपयुक्त असतात (3 reuse of marigold flower zendu of dussehra for beauty).
आयुर्वेदामध्येही अनेक आजारांवर झेंडूच्या फुलांचा इलाज सांगितला आहे. झेंडूच्या फुलांमध्ये खूप जास्त प्रमाणात ॲण्टी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे त्वचेच्या तक्रारी किंवा एकूणच आरोग्यासाठी ही फुलं उपयुक्त ठरतात. या फुलांमध्ये ग्लायकोप्रोटीन आणि न्यूक्लियोप्रोटीन हे घटक असतात. हे दोन्ही घटक त्वचेतील सेल्स वाढण्यासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे झेंडुचे फूल चेहऱ्यावर लावल्यास त्वचा कायम तुकतुकीत आणि सतेज दिसण्यास मदत होते. इतकेच नाही तर थंडीच्या दिवसांत त्वचा खूप कोरडी होते अशावेळी मॉईश्चरायजिंग इफेक्ट म्हणूनही या फुलांचा चांगला फायदा होतो. पाहूयात सौंदर्य वाढवण्यासाठी या फुलांचा नेमका कसा वापर करायचा...
१. त्वचेच्या सुरकुत्या कमी होण्यासाठी टोनर म्हणून...
४ ते ५ फुलांच्या पाकळ्या काडून त्या पाण्यात घालून हे पाणी गॅसवर चांगले उकळावे. पाकळ्यांचा अर्क पाण्यात उतरेल आणि अगदी कमी पाणी राहील तेव्हा गॅस बंद करायचा आणि हे पाणी एका भांड्यात गाळून घ्यायचे. या पाण्यात कोरफडीचा गर घालून एक पेस्ट तयार करायची. ही पेस्ट टोनरप्रमाणे रोज सकाळ -संध्याकाळ चेहऱ्याला लावायची. त्वचा मॉईश्चराइज होण्यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होतो. तसेच सुरकुत्या कमी होऊन चेहऱ्यावर चमक येण्यासाठी हा नैसर्गिक उपाय केव्हाही चांगला.
२. असे करा स्क्रब
हात-पाय आणि मान यांच्यावरचे टॅनिंग किंवा काळेपणा कमी करण्यासाठी झेंडूची फुलं फायदेशीर ठरतात. यासाठी झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या काढून घ्या. त्या मिक्सरमध्ये वाटून त्याची जाडसर पेस्ट करून घ्या. त्यामध्ये थोडी साखर आणि थोडा मध टाका. हे मिश्रण हात, पाय, पाठ, मान याठिकाणी हलक्या हाताने चोळून लावा आणि नंतर स्वच्छ धुऊन घ्या. त्वचा स्वच्छ, मऊ-मुलायम होईल. पण हा स्क्रब चेहऱ्यावर लावू नका.
३. हेअर मास्क
पाकळ्या स्वच्छ धुवून ग्राइंडरमध्ये बारीक करून गुळगुळीत पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये आवळा पावडर आणि एलोवेरा जेल मिक्स करा.केसांना वेगवेगळ्या भागात विभाजित करा. ही पेस्ट टाळूवर आणि केसांच्या टोकांवर लावा. १५ मिनिटांनंतर केस नेहमीप्रमाणे कोमट पाण्याने धुवा, शेवटी खोबरेल तेल लावा. आठवड्यातून एकदा हा पॅक वापरल्याने कोंडा, कोरडेपणा यांसारख्या समस्येपासून सुटका मिळू शकते.