Join us  

पुदिना चटणी आवडते, मग पुदिना फेसपॅकही आवडेल, 3 प्रकारचे पुदिना हिरवेगार सुगंधी फेसपॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 5:59 PM

चटणीसाठी आणलेला पुदिना वापरा सौंदर्यासाठीही! 3 प्रकारच्या पुदिना फेसपॅकनं भर उन्हाळ्यातही चेहरा दिसेल दिवसभर फ्रेश 

ठळक मुद्देपुदिन्यासोबत काकडी, तुळस आणि मुल्तानी माती यांचा उपयोग करुन सौंदर्यविषयक समस्या दूर करुन चेहरा भर उन्हाळ्यातही फ्रेश ठेवता येतो.पुदिना आणी तुळशीच्या लेपानं त्वचेशी निगडित समस्या दूर करता येतात.उन्हाळ्यात चेहऱ्यावर आलेला तेलकटपणा घालवण्यासाठी पुदिना आणि मुल्तानी मातीच्या लेपाचा उपयोग होतो. 

स्वयंपाकात चटणी, ज्यूसेस,स्मूदी यात स्वादासाठी वापरल्या जाणाऱ्या पुदिन्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. शॅम्पू, क्लीन्जर, टोनर या सौंदर्य उत्पादनात पुदिन्याचा वापर केला जातो. चेहरा फ्रेश दिसण्यासाठी घरच्याघरीही पुदिन्याचा वापर करता येतो. पुदिन्यामध्ये सूक्ष्म जीवविरोधी, जिवाणूविरोधी आणि ॲण्टिसेप्टिक गुणधर्म असल्यानं त्वचारोगामध्ये पुदिना फायदेशीर मानला जातो.

Image: Google

पुदिन्यामध्ये अ जीवनसत्व, सैलिसिलिक ॲसिड हे गुणधर्म असल्यानं  चेहऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या घालवण्यासाठी त्याचा उपयोग करता येतो. चेहऱ्यावरील सूज घालवण्यासाठी तसेच चेहरा उजळ करण्यासाठी, त्वचेचं घातक अशा फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यासाठी पुदिना फायदेशीर ठरतो. लेपाच्या स्वरुपात पुदिना वापरण्याचे 3 प्रकार आहेत. पुदिन्यासोबत काकडी, तुळस आणि मुल्तानी माती यांचा उपयोग करुन सौंदर्यविषयक समस्या दूर करुन चेहरा भर उन्हाळ्यातही फ्रेश ठेवता येतो.

 

Image: Google

पुदिना आणि काकडीचा लेप

उन्हाळ्याच्या काळात आरोग्यासाठी पुदिना आणि काकडी दोन्हीही आवश्यक आणि फायदेशीर. या दोन्हींचा उपयोग करुन फेसपॅक तयार करता येतो. यासाठी पुदिन्याची ताजी पानं आणि अर्धी काकडी किसून घ्यावी. काकडीचा रस काढावा. काकडीचा रस आणि पुदिन्याची पानं एकत्र वाटावी. ही पेस्ट पूर्ण चेहऱ्याला आणि मानेला लावून 20 मिनिटं ठेवावी. 20 मिनिटानंतर चेहरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवावा. चेहरा उजळ करण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा पुदिना काकडीचा लेप चेहऱ्यास लावावा. या लेपामुळे त्वचा टोन होते, चेहऱ्यावर चमक येते.  या लेपाद्वारे त्वचेत आर्द्रता टिकवता येते आणि त्वचा चमकते.

Image: Google

पुदिना आणि तुळस

उन्हाळ्यात त्वचेशी निगडित अनेक समस्या निर्माण होतात. पुदिना आणी तुळशीच्या लेपानं त्वचेशी निगडित समस्या दूर करता येतात. यासाठी पुदिना, तुळस आणि कडुलिंबाची पानं घ्यावी. सर्व एकत्र नीट वाटून ही पेस्ट चेहरा आणि मानेस लावून अर्धा तास ठेवावी. अर्ध्या तासानं चेहरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवावा. उन्हाळ्यात चेहरा मलूल दिसतो. त्वचा निस्तेज होते. तुळस आणि पुदिन्याच्या लेपानं चेहऱ्यावर तेज येते. या लेपानं त्वचेवरील डाग, मुरुम-पुटकुळ्या  निघून जातात. चेहऱ्यावरील सूज कमी होते. 

Image: Google

पुदिना आणि मुल्तानी माती

उन्हाळ्यात त्वचा जास्त तेलकट होते. पुदिना आणि मुल्तानी मातीचा लेप तेलकटपणा कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. या फेस पॅकनं त्वचा फ्रेश होते. त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जातं. हा फेस पॅक तयार करण्यासाठी पुदिन्याची पानं वाटून घ्यावी. वाटलेल्या पानांमध्ये 1 चमचा मुल्तानी माती, 1 चमचा मध किंवा दही घालावं. हे चांगलं मिसळून हा लेप चेहऱ्यास लावून 20 मिनिटं ठेवावा. नंतर चेहरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवावा. पुदिना आणि मुल्तानी मातीचा लेप लावल्यानं त्वचा चमकते. घामानं आणि तेलानं त्वचेला आलेला चिकटपणा कमी होतो. उन्हाळ्यात आग आग होणाऱ्या त्वचेला पुदिन्याच्या लेपामुळे थंडावा मिळतो. 

टॅग्स :ब्यूटी टिप्ससमर स्पेशलत्वचेची काळजी