Join us  

सणावाराला हौसेने मेकअप करता, पण मेकअप नीट काढला नाही तर? पाहा मेकअप काढण्याचे ४ नैसर्गिक उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2023 9:26 AM

4 Easy Home Remedy for make up Removal : मेकअप करण्याला जितके महत्त्व आहे तितकेच तो काढून टाकण्यालाही महत्त्व असायला हवे.

सणावाराला किंवा कोणत्या समारंभाला जाताना आपण हौशेने मेकअप करतो. यामध्ये आपण अगदी भरपूर वेगवेगळी प्रॉडक्ट वापरुन चेहरा सुंदर दिसावा यासाठी प्रयत्न करतो. बराच काळ हा मेकअप छान टिकल्याने आपण त्या कार्यक्रमात उठूनही दिसतो. मात्र कार्यक्रमावरुन किंवा सणवार सेलिब्रेट करुन आपण जेव्हा घरी येतो तेव्हा आपण खूप थकलेले असतो. केमिकल्स असणारी ही उत्पादने आपल्या चेहऱ्यावर बराच काळ तशीच असतात. सुंदर दिसण्यासाठी त्यांचा उपयोग होत असला तरीही त्वचेच्या आरोग्यासाठी ही उत्पादने म्हणावी तितकी चांगली नसतात. त्यामुळे ठराविक काळाने ही उत्पादने चेहऱ्यावरुन काढून टाकणे अतिशय गरजेचे असते (4 Easy Home Remedy for make up Removal). 

अन्यथा त्वचेवर या रासायनिक घटकांचा परीणाम होऊन त्वचा काळवंडणे, फोड येणे, निस्तेज किंवा कोरडी होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळेच मेकअप करण्याला जितके महत्त्व आहे तितकेच तो काढून टाकण्यालाही महत्त्व असायला हवे. मेकअप काढण्याची उत्पादनेही अतिशय महाग असतात, ती घेणे आपल्याला परवडेलच असे नाही. अशावेळी घरच्या घरी नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन आपण मेकअप सहज काढू शकतो. आता मेकअप काढताना नेमका कोणत्या पद्धतीचा कशाप्रकारे वापर करावा याबाबत माहिती घेणे आवश्यक आहे. 

(Image : Google )

१. नारळाचं किंवा बदामाचं तेल

नारळाचं किंवा बदामाचं तेल हे नैसर्गिक असल्याने आणि त्यातील घटक हे त्वचेसाठी अजिबात घातक नसल्याने त्याचा आपण मेकअप काढण्यासाठी नक्की वापर करु शकतो. यासाठी कॉटन बॉलवर नारळाचं किंवा बदामाचं तेल घेऊन किंवा हातावर तेल घेऊन बोटांनी चोळून मेकअप काढायला हवा. त्यानंतर चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवायला हवा. 

२. मध आणि कोरफड 

एक चमचा कोरफडीचा गर आणि १ चमचा मध एकत्र करायचे. यामध्ये २ चमचे तेल किंवा तूप घातल्यास हे मिश्रण मऊ होण्यास मदत होते. हे मिश्रण चेहऱ्याला लावून चांगला मसाज करायचा आणि काही वेळ ते चेहऱ्यावर तसेच ठेवून मग कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकायचा. यामुळे चेहऱ्यावर लावलेली रासायनिक उत्पादने निघण्यास मदत होईल. 

३. दूध आणि दही

साधारण १ चमचा दही आणि थोडेसे दूध एकत्र करुन त्याची पेस्ट तयार करुन घ्या. या पेस्टने चेहरा चांगला चोळा आणि मग पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या स्वच्छ होण्यास मदत होईल. 

(Image : Google )

४. गुलाब पाणी 

गुलाब पाणी हे नैसर्गिक क्लिंजर असल्याने मेकअप काढण्यासाठी त्याचा अतिशय चांगला वापर होऊ शकतो. कापसावर गुलाब पाणी घेऊन त्याने चेहरा स्वच्छ केल्यास मेकअपची उत्पादने निघण्यास मदत होते. त्यानंतर चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुतल्यास रासायनिक घटक निघून जातात आणि त्वचेला ऑक्सिजन घेण्यास मोकळी जागा मिळते.  

टॅग्स :दिवाळी 2023ब्यूटी टिप्समेकअप टिप्सत्वचेची काळजी