Join us  

टाचांना भेगा, खडबडीत झालेले पाय होतील लोण्यासारखे मऊ, ग्लिसरीन आणि मधाचे 4 सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2022 6:47 PM

भेगाळलेल्या टाचांमुळे खडबडीत झालेले पाय होतील लोण्यासारखे मऊ .. ग्लिसरीन, मध आणि माॅशचरायझरचे 4 सोपे उपाय 

ठळक मुद्देत्वचेतील आर्द्रता लुप्त झाल्यानं टाचांना भेगा पडतात. टाचा मऊ राहण्यासाठी, भेगा पडू नये म्हणून आणि भेगा असल्या तर त्या बऱ्या होण्यासाठी ग्लिसरीन, मध आणि माॅश्चरायझरचा उपयोग होतो. 

भेगाळलेल्या टाचा हे अनेकींचं कायम स्वरुपीचं दुखणं असतं. ऋतू कोणताही असो टाचांना भेगा पडतातच. टाचांच्या भेगांमुळे पायाचं सौंदर्य तर बिघडतंच शिवाय भेगांमुळे टाचा सतत दुखत असल्यानं लक्षही विचलीत होतं. पायांच्या भेगांवर पेडिक्यूअर, मेडिकलमधले मलमं उपयोगी पडत नसतील तर घरगुती उपाय करुन पाहा. मध, ग्लिसरीन, गरम पाणी आणि माॅश्चरायझर यांचा वापर करुन पायाच्या भेगा सहज घालवून पाय लोण्यासारखे मऊसर करणं शक्य आहे. 

Image: Google

1. टाचांच्या भेगांवर ग्लिसरीन हा चांगला उपाय आहे. ग्लिसरीनमुळे टाचांच्या त्वचेला आर्द्रता मिळते. रोज रात्री झोपण्यापूर्वी एका वाटीत ग्लिसरीन घ्यावं. त्यात थोडा लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण चांगलं एकजीव करुन ते टाचांच्या भेगांना लावावं . या उपायानं भेगा मऊ पडतात, तसेच भेगांमधील घातक जिवाणू मरायला मदत होते. हा उपाय नियमित केल्यास भेगा बऱ्या होतात.

 

Image: Google

2. टाचांना भेगा पडल्यावर केवळ त्वचा खडबडीत होत नाही तर टाचांमधून जंतूसंसर्ग होण्याचा धोकाही असतो. टाचा दुखतात. भेगा मऊ पडून दुखण्यावर आराम पडण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा. रात्री झोपण्याआधी पायांना सोसवेल एवढं पाणी गरम करावं. पाण्यात थोडं मीठ घालावं. या पाण्यानं पाय नीट धुवावे. मीठ घातलेल्या गरम पाण्यानं पाय धुतल्यानं भेगांमध्ये अडकलेली घाण निघून जाते. 

Image: Google

3. टाचांच्या भेगा भरुन येण्यासाठी मधाचा उपाय करावा. यासाठी रोज रात्री झोपण्याआधी मध, दूध आणि संत्र्याचा रस यांचं मिश्रण करुन ते भेगांना लावावं. यामुळे भेगा मऊ पडून बऱ्या होण्यास मदत होते. 

Image: Google

4. त्वचेतील आर्द्रता लुप्त झाल्यानं टाचांना भेगा पडतात. टाचा मऊ राहण्यासाठी, भेगा पडू नये म्हणून आणि भेगा असल्या तर त्या जाण्यासाठी, त्या स्वच्छ करण्यासाठी माॅश्चरायझरचा उपयोग होतो. रोज रात्री टाचांना माॅश्चरायझर लावल्यानं भेगा लवकर भरतात.