जसजसा हिवाळा पुढे सरकतो तसतशी त्वचा आणखीनच कोरडी होत जाते. आधी आणलेलं कोल्ड क्रीम, माॅश्चरायझरची बाटली रिकामीही झालेली नसते की हे काही कामाचं नाही म्हणत वेगळ्या क्रीमची शोधाशोध करावी लागते.
Image: Google
त्वचा मऊ राखणं म्हणजे महाकठीण काम आणि त्यासाठी महागडी कोल्ड क्रीम्स, स्पेशल माॅस्चरायझरर्स हवीत असं नाही. घरगुती उपायांनी देखील हिवाळ्यात कोरडी आणि रखरखीत होणारी त्वचा, उलणारे गाल मऊ होतात. त्यासाठी घरच्याघरी करता येतील असे पाच प्रकारचे लेप आहेत. त्यामुळे कोल्ड क्रीमचा धावा सोडा आणि घरगुती लेपांवर लक्ष केंद्रित करा.
कोल्ड क्रीमपेक्षाही असरदार लेप
Image: Google
1. ऑलिव्ह ऑइल आणि काॅफी
ऑलिव्ह ऑइल आणि काॅफी पावडर हा त्वचा मऊ करण्यासाठी उत्तम लेप आहे. हा लेप तयार करण्यासाठी एका वाटीत दोन चमचे ऑलिव्ह ऑइल घ्यावं. त्यात एक चमचा काॅफी पावडर मिसळावी. हे दोन्ही चांगलं एकजीव करावं. आधी चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा आणि रुमालानं टिपून घ्यावा. लेप चेहऱ्याला लावावा. 15 मिनिटं ठेवून नंतर चेहरा कोमट पाण्यानं धुवावा.हा लेप त्वचेवर उत्तम काम करतो. त्वचा मऊ होण्यास, त्वचेतील आर्द्रता टिकून राहाण्यास या लेपानं मदत होते.
Image: Google
2. चंदन पावडरचा लेप
हिवाळ्यात गारव्यानं आणि हवेतील कोरडेपणानं त्वचा कोरडी तर पडतेच शिवाय काळसरही होते. त्वचेची चमक हरवते. कडक हिवाळ्यातही चंदन पावडरच्या लेपानं त्वचेवरचा ग्लो जपता येतो. त्यासाठी एका वाटीत एक चमचा शुध्द चंदन पावडर घ्यावी. चंदन पावडरमध्ये भेसळ असण्याची शक्यता असते म्हणून चंदन पावडर ही नेहमी नावाजलेल्या आयुर्वेदिक औषधांच्या दुकानातच घ्यावी. एक चमचा चंदन पावडरमध्ये 1 चमचा मध मिसळावं. तसेच या लेपात 2 चमचे कोरफड तेल घालावं. सर्व घटक नीट मिसळून घ्यावेत. हा लेप चेहऱ्याला लावून 15 मिनिटं ठेवावा. नंतर लेप कोमट पाण्यानं धुवावा. हा लेप लावल्यानं त्वचेत ओलसरपणा निर्माण होवून तो टिकून राहाण्यास मदत होते.
Image: Google
3. बीट आणि मुलतानी माती
एका वाटीत 1 चमचा मुलतानी माती घ्यावी. यामधे 3 ते 4 चमचे बीटाची पावडर घालावी. बीटाची पावडर आयुर्वेदिक दुकानांमध्ये मिळते. मुलतानी माती आणि बीटाच्या पावडरध्ये 1 ते 2 चमचे दही आणि बदाम तेलाचे 2 थेंब घालावेत. हे सर्व जिन्नस नीट मिसळून एकजीव करावं. चेहरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवावा. रुमालानं टिपून मग हा लेप चेहऱ्यास लावावा. लेप 15 मिनिटानंतर साध्या थंड पाण्यानं धुवावा. या लेपामुळे चेहऱ्याचा रखरखीतपणा कमी होवून त्वचा मऊ मुलायम होते.
Image: Google
4. खोबऱ्याचं तेल आणि साखर
थंडीमधे त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. या समस्येवर खोबरेल तेलाचा चांगला परिणाम होतो. एका वाटीत 1 किंवा 2 चमचे खोबरेल तेल घ्यावं. यामधे थोडी पिठी साखर घालावी. साखर आयत्या वेळेस मिक्सरमधून काढून पिठी साखर करावी. तेलात पिठी साखर चांगली मिसळून घ्यावी. हा लेप चेहऱ्यासोबतच हाता-पायाची त्वचा कोरडी पडलेली असते तिथे देखील लावावा. अर्धा तासानं चेहरा आणि हा लेप जिथे लावला तो भाग कोमट पाण्यानं धुवून घ्यावा. चेहरा धुतल्यानंतर रुमालानं केवळ टिपावा. तो रगडून पुसू नये. या लेपामुळे त्वचा मऊ होते.