Join us  

हेड मसाज करण्याच्या ४ सोप्या पद्धती! करा तेल मालिश -स्ट्रेस कमी आणि केसही होतील सुंदर-मुलायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2023 4:28 PM

4 Methods Of Using Coconut Oil Hair Care Tips : नुसतेच तेल लावण्यापेक्षा काही खास पद्धतींचा वापर केला तर केसांना त्याचा नक्कीच चांगला फायदा होतो.

ठळक मुद्देकेसांच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी तेल लावताना वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करावानुसते तेल लावल्याने केस मुलायम होतात असे नाही...

केसांना तेल लावणं ही आपल्या हेअर केअर रुटीनमधील अतिशय सामान्य गोष्ट आहे. केस धुवायचे असतील किंवा डोकं दुखत असेल तर आपण रात्री झोपताना आवर्जून केसांना तेलाची चंपी करतो. यामध्ये आपण बऱ्याचदा खोबरेल तेलाचा वापर करतो. हे तेल हातावर घेऊन केसांच्या मुळांना आणि वरच्या केसांनाही लावतो. यामुळे केस मुलायम आणि मजबूत होण्यास मदत होते असा आपला समज असतो. मग या तेलाचा चिपचिपीतपणा कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे शाम्पू वापरतो. तेल लावल्याने केसांना फायदा होतो हे खरे असले तरी अशाप्रकारे नुसतेच तेल लावण्यापेक्षा काही खास पद्धतींचा वापर केला तर केसांना त्याचा नक्कीच चांगला फायदा होतो. आता तेल लावताना अशा कोणत्या ट्रिक्स किंवा पद्धती वापरता येतील ज्याचा आपल्याला खास फायदा होईल ते पाहूया (4 Methods OF Using Coconut Oil Hair Care Tips)... 

१. तेल केसांत चागलं मुरावं म्हणून..

आपण ज्याप्रमाणे हातावर तेल घेवून मग केसांच्या मुळांना बोटाने तेल लावतो. त्याचप्रमाणे सगळ्या डोक्याला आणि केसांच्या वरच्या भागाला तेल लावून मसाज करुन घ्यायचा. त्यानंतर गरम पाण्यात सुती टॉवेल किंवा कॉटनचा जुना टिशर्ट बुडवून तो पिळून तो केसांवर बांधायचा. यामुळे केसांना वाफ म्हणजेच स्टीम मिळण्यास मदत होते. यामुळे डोक्याचे पोर्स ओपन होतात आणि तेल केसांच्या मुळांमध्ये मुरण्यास चांगली मदत होते. याशिवाय जर तुमच्याकडे हेअर स्टीमर असेल तर त्याचाही वापर करु शकता. 

(Image : Google)

२. केस गळती थांबून केसांची वाढ व्हावी तर...

आपण साधारणपणे कोणतंतरी एकच तेल केसांना नियमितपणे लावतो. पण खोबरेल तेलामध्ये एरंडेल तेल एकत्र करुन ते केसांना लावल्यास चांगला फायदा होतो. एरंडेल तेल थोडं घट्ट आणि चिकट स्वरुपाचं असलं तरी केसांच्या वाढीसाठी ते फायदेशीर असते. त्यामुळे केस धुण्याच्या १ तास आधी हे २ तेलांचे मिश्रण केसांना अवश्य लावावे. यामुळे केसगळती कमी होऊन केसांची वाढ होण्यासही चांगली मदत होईल. 

३. कोंडा असेल तर...

केसांत खूप कोंडा असेल तर एकतर आपण केसांना खूप तेल लावतो किंवा अजिबात तेल लावत नाही. पण केसांतला कोंडा कमी करायचा असेल तर खोबरेल तेलात लिंबू पिळून मग ते तेल केसांना लावा. यामुळे कोंड्याची समस्या कमी होण्यास मदत होईल. 

४. केस खूप भुरकट असतील तर

आपले केस सिल्की असावेत अशी आपल्या प्रत्येकाची इच्छा असते. पण काही ना काही कारणाने केस खूप रुक्ष आणि कोरडे होतात किंवा खूप भुरकट दिसतात. अशावेळी १ चमचा दही घेऊन त्यामध्ये मध घालावा आणि १ चमचा खोबरेल तेल घालून हे मिश्रण केसांना लावावे. यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होऊन ते सिल्की होण्यास मदत होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी