उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला खूप गरम होतं, यामुळे अनेकांना खूप घामही येतो. या घामाचा वास यायला लागला की आपल्याला आणि आजुबाजूच्यांनाही त्याचा त्रास होतो. ट्रेनने प्रवास करताना, ऑफीसमध्ये किंवा एरवीही या घामाचा वास येत राहतो. हा वास अनेकदा सहन न होणारा असतो, अंगाला आणि कपड्यांना हा वास येऊ नये म्हणून आपण भरपूर परफ्यूम मारत राहतो. मात्र परफ्यूम आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठीही तितका चांगला नसतो. अनेकांना तर परफ्यूम मारल्यावर मोठ्या प्रमाणात रॅश येणे, आग होणे, लाल होणे अशा समस्या उद्भवतात. असे होऊ नये म्हणून परफ्यूम मारताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. प्रसिद्ध स्टायलिश आणि इमेज कोच इशिता सालुजा परफ्यूम मारण्याविषयी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात. परफ्यूम मारताना कोणत्या चुका आवर्जून टाळायला हव्यात याविषयी त्या सांगतात (Avoid 4 Mistakes While Applying Perfume)...
१. मनगटावर लावताना
अनेकदा आपण परफ्यूम काखेत न मारता मनगटावर किंवा कानाच्या मागे मारतो. मनगटावर परफ्यूम मारल्यावर आपण मनगट एकमेकावर घासतो. यावेळी आपल्या त्वचेतून तयार होणारे नैसर्गिक तेल किंवा मॉईश्चर यामध्ये हा परफ्यूम मिक्स होतो. यामुळे परफ्यूमचा वास लवकर निघून जातो आणि तो मारण्याचा काहीच उपयोग होत नाही. पण तुम्हाला मनगटावर मारायचाच असेल तर परफ्यूम मारल्यावर तो न चोळता तसाच ठेवा.
२. प्रमाणापेक्षा जास्त परफ्यूम मारणे
आपण घामाचा वास जाण्यासाठी किंवा फ्रेश वाटण्यासाठी आणि अंगाला चांगला वास येण्यासाठी परफ्यूम मारतो. पण तो प्रमाणापेक्षा जास्त मारला तर त्याचा वास आपल्या नाकात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकांना नकोसे होऊ शकते, म्हणूनच परफ्यूम योग्य प्रमाणात मारणे केव्हाही जास्त चांगले. त्यामुळे तो नकोसा न होता चांगले वाटण्यास मदत होते.
३. चुकीच्या जागी परफ्यूम मारणे
परफ्यूमचा योग्य पद्धतीने उपयोग व्हावा यासाठी तो शरीराच्या नेमक्या ठिकाणी मारणे आवश्यक असते. अन्यथा त्याचा वास लगेच उडून जातो आणि त्याचा काहीच उपयोग होत नाही. परफ्यूम दिर्घकाळ टिकावा यासाठी तो मान, मनगट, कानामागील भाग आणि कोपराच्या आतील भाग याठिकाणी मारावा. कपड्यांवर परफ्यूम मारल्यावर त्याचे डाग पडतात आणि अंगापेक्षा कपड्यांनाच त्याचा वास जास्त राहतो.
४. त्वचेचा प्रकार लक्षात घ्यावा
परफ्यूममध्ये काही प्रमाणात अल्कोहोल असल्याने तो लावल्यानंतर त्वचा कोरडी पडण्याची शक्यता असते. तसेच वास दिर्घकाळ आणि जास्त टिकावा यासाठी मॉईश्चराइज केलेल्या त्वचेवर परफ्यूम लावणे केव्हाही चांगले.