दिवाळी म्हणजे आनंदाची देवाणघेवाण करण्यासाठी एकमेकांना भेटणे. पण हे भेटायला जाताना सजणे-धजणे तर आलेच. एकमेकांच्या घरी जेवायला जाताना किंवा बाहेर एकत्र भेटताना आपला लूक कसा असावा यासाठी आपली मागच्या महिनाभरापासून तयारी सुरु असते. नवनवीन कपडे, दागिने, मेकअपचे सामान, चपला, हँडबॅग हे सगळे खरेदी करुन झालेले असते. पण तरीही ऐनवेळी काही ना काही कारणाने आपल्याला ठरलेल्या ठिकाणी पोहोचायला उशीर होतो आणि मग सगळ्यांचे टोमणे ऐकायची वेळ येते. पण हे सगळे टाळायचे असेल तर आधीपासूनच योग्य पद्धतीने प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. कोणत्या दिवशी काय घालायचे, कशावर काय घालायचे या गोष्टींचे नियोजन आणि तयारी आधीच करुन ठेवा.
१. साड्यांचे नियोजन - दिवाळीतील कोणत्या दिवशी कोणती साडी नेसायची हे ठरले असेल तर ४ दिवसांच्या सगळ्यात साड्या नवीन नसतील अशावेळी साड्या धुवून इस्री करुन ठेवा. या साड्यांचे फॉल-पिको झालेले आहेत की नाही ते तपासा. एखाद्या साडीच्या पदराला जास्त वर्क असेल तर नेट लावलेले आहे की नाही पहा. एखादी आधीचीच साडी आपण पुन्हा घालणार असू तर त्या साडीला कुठे फाटले नाही ना याची खातरजमा करा.
२. साडीवरील इतर तयारी - साडीचे ब्लाऊज शिवून आणले असेल तरी ते योग्य पद्धतीने बसते ना हे आधीच तपासून घ्या. जर त्यात काही बदल गरजेचा असेल तर तो वेळीच करुन घ्या, म्हणजे ऐनवेळी अडचण होणार नाही. ब्लाऊजचा गळा मोठा असेल तर त्यामध्ये लागले अशी ब्रेसियर आपल्याकडे आहे की नाही हे तपासा. नसेल तर ती बाजारात जाऊन घेऊन या. साडीवरील मॅचिंग परकर तयार ठेवा. हा परकर एकदम नवीन असेल तर तो अंगाला चिकटण्याची शक्यता असते. तसेच त्यात जास्त गरम होऊ शकते. त्यामुळे तो भिजवून वाळवून ठेवा. परकरची उंची जास्त असल्यास ती वेळीच कमी करुन घ्या. अन्यथा साडी नेसायला घेतल्यावर आपली अडचण होते.
३. साडी नेसतानाची तयारी - आपल्याला साडी नेसता येत असेल तर ठिकच आहे. पण आपल्याला साडी नीट नेसता येत नसेल तर घरातील मंडळींना आपल्याला कधी-कुठे जायचे आहे याबाबत कल्पना देऊन ठेवा. म्हणजे त्यांची साडी नेसण्यासाठी मदत घेता येईल. घरात कोणी नसेल तर शेजारच्या एखाद्या मैत्रीणीला आपल्याला मदत करण्याबाबत सांगून ठेवा. साडीला लावायच्या सेफ्टी पिन, साडी पिन सगळे आहे की नाही हे तपासून व्यवस्थित एकाठिकाणी काढून ठेवा, यामुळे ऐनवेळी शोधाशोध करावी लागणार नाही.
४. मेकअप - दिवाळी म्हणजे सगळ्यांमध्ये उठून दिसण्यासाठी मेकअप तर हवाच. आपण वापरत असलेले मेकअपचे सामान आधीच तपासून ठेवा. एखादी गोष्ट संपलेली असेल तर ती खरेदी करता येईल. किंवा मेकअपच्या सामानातील काही गोष्टी जास्त दिवस वापरल्या नाही तर वाळून जातात. आपल्या सामानातील कोणत्या गोष्टीचे असे झाले नाही ना हे आधीच तपासून ठेवा. मेकअपच्या सामानाचा कप्पा योग्य पद्धतीने आवरलेला असेल तर ऐनवेळी गडबड होत नाही.
५. या गोष्टी आधीच करुन ठेवा - नखांना शेप देणे, नेलपेंट लावणे या गोष्टी आदल्या दिवशी किंवा दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा करता येण्यासारख्या असतात, त्या आधीच करुन ठेवा. पैंजण, जोडवी किंवा साधारणपणे जे दागिने आपण बाकी काहीही घातले तरी बदलणार नाही असे दागिने आधीच घालून ठेवा. त्यामुळे बाहेर जाताना तयार होण्याचा वेळ वाचेल.
६. दागिने - प्रत्येक साडीवर सूट होईल असा सेट, बांगड्या, अंगठी यांची तयारी आधीच करुन ठेवा. साडी-ब्लाऊज आणि परकर एका कव्हरमध्ये ठेऊन त्यावर हा सेट आणि बांगड्या ठेवल्यास ऐनवेळी शोधाशोध करावी लागणार नाही. तसेच कानातल्याच्या फिरक्या व्यवस्थित आहेत ना, गळ्यातल्याचे हूक तुटलेले नाही ना हे आधीच पाहून ठेवल्यास तुमचेच काम सोपे होऊ शकेल. आधीच्या दिवशी घातलेल्या बांगड्या, अंगठी किंवा कानातले दोन दिवसांनी दुसऱ्या साडीवर घालायची असल्यास काढल्या काढल्या नवीन साडीच्या बॉक्समध्ये ते ठेऊन द्या. कानातले वेल, नथ या गोष्टीही ज्या त्या साडीत ठेऊन द्या.
७. हेअरस्टाइल - ४ दिवस वेगवेगळ्या साड्यांवर तुम्ही वेगवेगळी हेअरस्टाइल करणार असाल तर त्यासाठी लागणारे सामानही साडीच्या बॉक्समध्ये ठेऊन द्या. जेणेकरुन वेळेला तुम्हाला घाई होणार नाही. आकडे, यु-पीन यांसारख्या गोष्टी ऐनवेळी मिळत नाहीत आणि मग त्यात खूप वेळ जातो. याबरोबरच जी टिकली लावायची आहे त्या टिकलीची पाकीटे नीट पाहून ठेवा. कोणत्या साडीला कोणत्या प्रकारची टिकली चांगली दिसेल हे ठरवून ते पाकीटही साडीसोबत ठेवा.