आपला चेहरा नितळ आणि सतेज असावा असं वाटणं स्वाभाविक आहे. पण कधी हार्मोनल बदलांमुळे तर कधी जीवनशैलीतील चुकीच्या गोष्टींमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे, डाग येणे, सुरकुत्या पडणे आणि अनावश्यक केसांची वाढ होणे अशा समस्या उद्भवतात. या समस्यांवर उपाय म्हणून काही वेळा आपण घरगुती उपाय करतो तर बरेचदा आपण पार्लरमध्ये जाऊन एखादी ट्रीटमेंट करण्याला प्राधान्य देतो. चेहऱ्यावर अनावश्यक केस असतील तर ते थ्रेडींगने किंवा व्हॅक्सिंगने काढले जातात. ब्लीच करुन हे केस लपवता येऊ शकतात. मात्र हे सगळे उपाय तात्पुरते असल्याने काही दिवसांनी ते पुन्हा पुन्हा करावे लागतात. हात किंवा पायाप्रमाणे चेहऱ्याचे व्हॅक्सिंग करणे आपल्याला त्यावेळी सोयीचे वाटत असले तरी चेहऱ्यावर त्याचा दिर्घकालीन परीणाम होत असतो. व्हॅक्सिंगने केस निघाल्यामुळे तात्पुरते आपल्याला फ्रेश आणि चांगले वाटू शकते. पण काही वेळाने त्वचेच्या तक्रारी निर्माण होण्याची शक्यता असते. पाहूयात फेशियल व्हॅक्सिंगमुळे चेहऱ्यावर कोणते साईड इफेक्टस (Side Effects of Facial Waxing)...
१. दुखापत होणे
वॅक्सिंग झाल्यावर त्वचा दुखणे, आग होणे सामान्य असले तरी चेहऱ्याच्या व्हॅक्सिंगमुळे चेहऱ्याची त्वचा जास्त प्रमाणात दुखू शकते. व्हॅक्स लावल्यावर पट्टी लावून जेव्हा ती ओढली जाते तेव्हा त्वचेवरील केस ओढले जातात आणि त्वचा जास्त प्रमाणात दुखावते. प्रत्येक व्यक्तीनुसार त्वचेची संवेदनशीलता, दुखणे सहन करण्याची क्षमता, व्हॅक्सचा प्रकार यांनुसार हे दुखणे कमी-जास्त होऊ शकते.
२. रेडनेस आणि रॅशेस
व्हॅक्सिंगनंतर ज्याप्रमाणे आपल्या हातावर आणि पायावर रॅशेस येतात त्याचप्रमाणे आपल्या चेहऱ्यावरही रॅशेस येतात. अनेकदा त्वचा ओढली गेल्याने ती लालसरही होते. चेहऱ्यावर बारीक फोड येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे फेशियल व्हॅक्सिंग करण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचे व्हॅक्सिंग, स्ट्रीप वापरतो याबाबत प्रत्येकाने योग्य ती काळजी घ्यायला हवी.
३. अनग्रोन हेयर
अनग्रोन हेयर असतील तर ते निघायला त्रास होतो. शेविंगच्या बाबतीत ज्याप्रमाणे अनग्रोन हेयर निघायला त्रास होतो म्हणून आपण रेजर उलटे फिरवतो त्याचप्रमाणे आपण व्हॅक्सिंग करतानाही स्ट्रीप उलट्या दिशेने फिरवतो. उलट्या दिशेने व्हॅक्सिंग स्ट्रीप फिरवल्यास या केसांची वाढ कमी होण्यास मदत होते मात्र त्याचा त्वचेला त्रास होण्याची शक्यता असते.
४. उन्हाचा त्रास होणे
अनेकदा आपल्या चेहऱ्यावर सनबर्नमुळे काही डाग पडलेले असतात किंवा रॅशेस आलेले असू शकतात. अशाप्रकारे सनबर्न असेल तर फेशियल व्हॅक्सिंग करणे टाळायला हवे. इतकेच नाही तर चेहऱ्याचे व्हॅक्सिंग केल्यानंतर लगेच उन्हात जाणे टाळायला हवे. व्हॅक्सिंगमुळे त्वचा संवेदनशील होते, अशावेळी चेहऱ्यावर सूर्यप्रकाश पडला तर त्वचेची जास्त आग होण्याची किंवा रॅशेस येण्याची शक्यता असते.