Join us  

केसांना कांद्याचं तेल लावण्याचे 5 फायदे, विकत कशाला आणायचं आता घरच्याघरी करा कांद्याचं तेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 2:00 PM

केसांना कांद्याचं तेल लावण्याचे 5 फायदे .. मनाजोगते सुंदर केस होण्यासाठी घरच्याघरी करा कांद्याचं तेल

ठळक मुद्देकांद्याचं तेल लावल्यानं केस खराब करणाऱ्या जिवाणुंचा संसर्ग रोखता येतो.केसांच्या मुळाकडील रक्तप्रवाह कांद्याच्या तेलानं सुधारतो आणि केस वाढण्यास गती मिळते. कांद्याचं तेल केसांसाठी नैसर्गिक कंडीशनरसारखं काम करतं. 

केस सुंदर, मुलायम असावेत ही इच्छा सगळ्यांचीच. पण धूळ, माती, प्रदूषण, बदलेलेली दोषपूर्ण जीवनशैली, रोजच्या जगण्यातील ताणतणाव यामुळे केस गळतात, खराब होतात. केसांच्या समस्या जटिल असल्यातरी या समस्यांवर उपाय शोधण्याची, महागडे हेअर केअर प्रोडक्टस घेऊन त्यावर पैसे खर्च करण्याची अजिबात गरज नाही. घरच्याघरी सहज स्वस्तात केस सुंदर करण्याचा अन केसांच्या समस्या घालवण्याचा उपाय करता येतो. केसांना कांद्याचं तेल लावल्यानं केसांचं सौंदर्य आणि केसांची गुणवत्ता वाढते. केसांना कांद्याचं तेल लावण्याचे फायदे अनेक आहेत. ते समजून घेतल्यास घरच्याघरी कांद्याचं तेल तयार  करण्याची प्रेरणा नक्की मिळेल. 

Image: Google

केसांना कांद्याचं तेल लावल्यास..

1. केसांना कांद्याचं तेल लावल्यास केसांची वाढ होते. कांद्याच्या तेलात असलेल्या सल्फरमुळे केसांना उंदरी लागणं, केस गळणं या समस्या दूर होतात. कांद्याचं तेल लावल्यानं केस दाट होतात. कांद्याच्या तेलामुळे केसांचा पीएच स्तर नियंत्रित राहातो. यामुळे केस पांढरे होत नाही. 

2. केसांमध्ये विविध जिवाणुंचा संसर्ग झाल्यास केस गळतात. केसांना कांद्याचं तेल लावल्यास केसांमधील जिवाणुंचा संसर्ग रोखला जातो. जिवाणुंचा संसर्ग टाळण्यासाठी केसांना नियमितपणे कांद्याच्या तेलाचा मसाज करावा. 

3. कांद्याच्या तेलात ॲण्टिऑक्सिडण्टस असतात. केस गळती रोखण्यास मदत करणाऱ्या विकरांना सक्रीय होण्यास ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे चालना मिळते. कांद्याचं तेल नियमित केसांना लावल्यास केसांचं पोषण होतं. या तेलातील सल्फर या घटकामुळे केसांच्या मुळांच्या त्वचेचं पोषण होतं. योग्य ते पोषण मिळाल्यानं केसांची मुळं घट्ट होतात. 

4. केसांच्या मुळाकडील रक्तप्रवाह व्यवस्थित असल्यास केसांची वाढ चांगली होते. कांद्याच्या तेलानं हा रक्तप्रवाह सुधारतो. 

5. कांद्याचं तेल हे केसांसाठी नैसर्गिक कंडीशनरसारखं काम करतं. कांद्याचं तेल नियमित केसांना लावल्यास केसांचा कोरडेपणा कमी होवून केस मऊ होतात. कांद्याच्या तेलानं केस गळती रोखली जाते.

Image: Google

कांद्याचं तेल कसं तयार करणार?

कांद्याचं तेल करण्यासाठी एक किंवा दोन कांद्याचा रस घ्यावा किंवा कांद्याची पेस्ट घ्यावी. कढईत खोबऱ्याचं तेल गरम करण्यास ठेवावं. तेल गरम झाल्यावर त्यात कांद्याची पेस्ट किंवा रस टाकावा. कांद्याचा रस करण्यासाठी कांद्या किसून तो एका सूती रुमालात बांधून त्याचा रस पिळून काढावा. कांद्याचा रस खोबऱ्याच्या तेलात घातल्यावर तेल सामान्य तापमानाला येवू द्यावं. तेल गार झालं की सूती कापडानं किंवा गाळणीनं गाळून घ्यावं. हे तेल हवाबंद बरणीत/ बाटलीत  भरुन ठेवल्यास ते सहा महिने देखील चांगलं राहातं.

Image: Google

कांद्याचं तेल कसं लावावं.?

कांद्याचं तेल केसांना नियमित लावल्यस केसांचा कोरडेपणा, केसांना उंदरी लागणं, कोंडा यासारख्या समस्या दूर होतात. हे तेल लावताना वाटीत घेऊन थोडं कोमट करावं. बोटांनी केसांच्या मुळांशी हलका मसाज करत ते लावावं. कांद्याच्या तेलाला वास येतो. त्यामुळे हे तेल रात्री झोपण्याआधी केसांना लावावं आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पू लावून  केस धुवावेत. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीकांदा