Join us  

केस गळण्याची ५ कारणं, तज्ज्ञ सांगतात; केस गळण्याची खरी समस्या; नुसते वरवर उपाय काय कामाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2022 6:44 PM

केस गळतात म्हणून केसांना महागडे हेअर प्रोडक्टस लावून उपयोग होणार नाही. त्यासाठी आधी केस गळण्याची ( hair fall causes) कारणं समजून घेणं महत्वाचं. कारणं समजली तरच उपायांना ( solution on hair fall) योग्य दिशा मिळते असं तज्ज्ञ म्हणतात. 

ठळक मुद्देशरीरात लोह/ हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास केस गळतातकेस सुंदर करण्यासाटी केले जाणारे उपायच केसांसाठी घातक ठरतात. आपण घेत असलेल्या आहारात पोषणाची कमतरता असल्यास केस गळतात.

सौंदर्यात केसांची भूमिका महत्वाची असते. म्हणूनच केस गळायला (hair fall)  लागले की मुली, महिला अस्वस्थ होतात. केस गळती थांबवण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधतात. महागडे शाम्पू, कंडिशनर, सीरम, तेल, जेल असं बरंच काही वापरतात. पण केस गळणं काही थांबत नाही. याचं कारण म्हणजे केस गळतीचं नेमकं कारण काय हेच माहित नसतं. आयुर्वेद तज्ज्ञ दीक्षा भावसार या केस गळतीवर उपाय करण्याआधी कारणं ( hair fall causes)  समजून घेण्याचा सल्ला देतात. 5 कारणांमुळे केस गळतात . ही कारणं जर समजली तर केस गळतीवर योग्य उपचार ( solutions on hair fall)  करता येतील. 

Image: Google

केस गळतात कारण...

1. मुली आणि महिलांमध्ये केस गळण्याचं मुख्य कारण म्हणजे शरीरात लोह/ हिमोग्लोबीनची असलेली कमतरता. शरीरात जर पुरेसं लोह नसेल तर रक्तात हिमोग्लोबीनची कमतरता निर्माण होते. हीमोग्लोबीन शरीरात पेशींची वाढ आणि दुरुस्तीसाठी ऑक्सिजनचं वहन करतात. यात केसांचं पोषण करणाऱ्या पेशींंचाही समावेश असतो. त्यामुळे शरीरात लोह आणि हिमोग्लोबीन कमी असल्यास केस गळतात. यासाठी शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यसाठी योग्य उपचार आणि आहाराची गरज असते. 

2. केस सुंदर दिसण्यासाठी केसांवर हेयर डाय, हेयर स्टायलिंग जेल , केरोटिन ट्रीटमेण्ट, हेयर स्प्रे अशा हेअर प्रोडक्टसचा आणि हेअर ट्रीटमेण्टचा  वापर केला जातो. यात विविध रसायनांचे प्रयोग क्सांवर होतात. यामुळे केस तुटतात. रसायनयुक्त शाम्पू- कंडिशनरच्या वापरानं केस गळतात.  काही हेअर स्टायलिंग उत्पादनात केसांना, केसांच्या मुळांना ॲलर्जी करणारे घटक असतात यामुळे केस गळतात. केस सुंदर दिसण्यासाठी केले जाणारे उपायच केसांच्या मुळावर येतात हे समजून घ्यायला हवं. 

3. थायराॅइड ग्रंथीमध्ये असंतुलन निर्माण झाल्यस केस गळतात. थायराॅइड ग्रंथी जर व्यवस्थित काम करत अस्तील तर त्याचा चांगला परिणाम केसांच्या वाढीवर होतो. थायराॅइड ग्रंथीमध्ये असंतुलन निर्माण झाल्यास त्यावर योग्य उपचार करुन घेणं आवश्यक असतं. 

4. आपण काय खातो पितो त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होतो. त्वचा आणि केसांवरही त्याचे परिणाम दिसतात. आपण घेत असलेल्या आहारातून शरीराला पुरेशा प्रमाणात ड, बी 12 जीवनसत्वं, बायोटिन, प्रथिनं, कॅल्शियम  हे घटक मिळाले नाहीत तर केस गळतात.

5. अपुरी झोप, शांत झोप न लागणं या झोपेशी निगडित कारणांमुळेही केस गळतात.

Image: Google

केस गळती रोखण्यासाठी.. केस गळती थांबवायची असेल तर काही उपाय आपण घरच्या सहज करु शकतो. या उपायांचा चांगला परिणाम केसांवर दिसतो. 

1. रोज  आहारात आवळा असावा. 

2. शरीरातील जीवनसत्वांची तपासणी करावी. जे जीवनसत्व कमी आहे त्यासाठी डाॅक्टर सांगितील ते उपाय करावेत.

3. साखरेऐवजी आहारात गुळाचा समावेश करावा. 

4. प्राणायाम सारखे श्वासाचे व्यायाम करावेत. 

5. केस धुताना गरम पाण्याऐवजी कोमट पाणी वापरावं.

6. ताण तणाव या मानसिक समस्यांवर वेळीच उपाय करावेत.  

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स