कोंडा ही एक अशी समस्या आहे ज्यामुळे बहुतांश जण हैराण असल्याचे आपण पाहतो. केसांची मुळे कोरडी पडल्याने किंवा प्रमाणापेक्षा जास्त तेलकट झाल्यानेही केसांत कोंडा होतो. याशिवायही कोंडा होण्यामागे प्रदूषण, आपण केसांसाठी वापरत असलेली उत्पादने, केसांना अन्नपदार्थांतून मिळणारे पोषण अशा बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात. यामध्ये इन्फेक्शन म्हणजेच त्वचेवर एकप्रकारची बुरशी येणे आणि त्वचा कोरडी पडणे असे २ प्रकार पाहायला मिळतात. पण हा कोंडा एकदा झाला की तो काही केल्या कमी होत नाही (5 Easy home remedies to treat hair dandruff).
मग हा कोंडा वाढला की तो केसांत वरती दिसायला लागतो आणि केस विंचरताना कपड्यांवरही पडतो. हवाबदल होताना केसातील कोंड्याचे प्रमाण जास्त वाढलेले दिसते. मग हा कोंडा कमी होण्यासाठी आपण केसांना तेल लावतो, बाजारात मिळणारी विविध उत्पादने वापरतो किंवा हेअर मास्क नाहीतर हेअर केअर ट्रीटमेंटस असे काही ना काही उपाय करतो. पण त्यामध्ये बरेच पैसे खर्च करावे लागतात. तसेच त्याचा म्हणावा तितका उपयोग होतोच असे नाही. म्हणूनच कोंडा जाण्यासाठी आज आपण घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय पाहणार आहोत.
१. दही
केसांच्या मूळांना दही लावल्याने कोंड्याची समस्या काही प्रमाणात कमी होते. यात लॅक्टीक अॅसिड आणि प्रोबायोटीक असतात. त्यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होऊन एकप्रकारे पोषण मिळण्यास मदत होते. यामुळे केस शाईनी आणि मुलायम होण्यासही त्याचा चांगला उपयोग होतो.
२. मेथी आणि लिंबू
मेथी दाण्यांमध्ये अँटीबॅक्टेरीअल आणि अँटीफंगल गुणधर्म असल्याने त्वचेचे इन्फेक्शन होण्यापासून तुमचा बचाव होऊ शकतो. सतत कोंडा होत असेल तर ३ ते ४ चमचे मेथ्यांचे दाणे आणि रात्रभर पाण्यात भिजवत ठेवायचे. सकाळी त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करायची आणि त्यात लिंबाचा रस घालून ही पेस्ट केसांच्या मुळांना लावून अर्धा तासाने नेहमीप्रमाणे केस धुवावेत.
३. कडुलिंबाची पाने
नैसर्गिकरित्या उपलब्ध असणारी ही पानं स्वच्छ करुन ती मिक्सरमधून बारीक करावी. या पानांची पेस्ट केसांच्या मुळांना लावल्यास कोंडा आणि इन्फेक्शन दूर होण्यास मदत होईल. केस धुण्याच्या अर्धा तास आधी हा पॅक केसांना लावून ठेवायचा आणि मग केस नेहमीप्रमाणे धुवायचे.
४. कापूर आणि तेल
तेल कोमट करुन त्यामध्ये कापूराची पावडर घालायची आणि हे चांगले एकजीव करायचे. हे तेल केसांना लावायचे आणि तासाभराने केस नेहमीप्रमाणे शाम्पू आणि कंडीशनरने धुवायचे.
५. कोरफड
कोरफड ही केस आणि त्वचा यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असते. कोरफडीचा गर घेऊन तो केसांच्या मुळांशी चोळावा. यामुळे कोंड्याने येणारी खाज, आग कमी होण्यास मदत होते. तसेच कोंड्याचे प्रमाण आटोक्यात येण्यासाठीही कोरफड फायदेशीर असते.