केस हा आपल्या सौंदर्यातील एक महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळेच केसांची आपण विशेष काळजी घेत असतो. पण आपण केसांची कितीही काळजी घेतली तरी प्रदूषण, वातावरण यांचा त्याच्यावर परीणाम होतो. त्यामुळे मग केस हळूहळू खराब व्हायला लागतात. थंडीत तर हवेतील कोरडेपणामुळे केस रुक्ष दिसतात. इतकेच नाही तर काही वेळा ते निर्जीव झाल्यासारखेही वाटायला लागतात. अशा केसांचा मुलायमपणा तर कुठल्या कुठे गेलेला असतो आणि कोरडेपणामुळे केस गळण्याचे प्रमाणही खूप वाढते. थंडीत केसांच्या या समस्यांवर उपाय म्हणून आपण तेलाने मसाज करणे, हेअर स्पा असं काही ना काही करुन पाहतो मात्र त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. पाहूयात थंडीत केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी नेमके कोणते उपाय केल्यास त्याचा फायदा होतो (5 Hair Care Tips for winter) .
१. तेलाने मसाज
आठवड्यातून २ वेळा केसांना तेलाने मसाज करायला हवा. त्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचे खोबरेल तेल, जोजोबा ऑईल, बदाम तेल, आवळा तेल असे कोणतेही तेल वापरु शकता. हे तेल थोडे कोमट करुन मग त्याने मसाज करावा. आवश्यकता वाटल्यास तुम्ही तेलामध्ये कांद्याचा रस घालू शकता. त्यामुळे केसांना चांगले पोषण मिळण्यास मदत होते.
२. शाम्पू करताना
अनेकदा आपण घाईघाईत शाम्पू हातात घेतो आणि तसाच केसांना लावतो. पण असे करण्यापेक्षा जितका शाम्पू आहे त्याच्या तिप्पट पाणी घेऊन त्यामध्ये शाम्पू पूर्ण मिसळून घ्यायचा. केसांवर डायरेक्ट शाम्पू लावल्यास ते जास्त कोरडे होण्याची शक्यता असल्याने हा उपाय केल्यास ते तितके कोरडे होत नाहीत.
३. केस धुताना
थंडीच्या दिवसांत आपल्याला नेहमीपेक्षा थोडे जास्त गरम पाणी घेण्याची इच्छा होते. पण तसे करणे त्वचेसाठी आणि केसांसाठीही चांगले नसते. गरम पाण्यामुळे केसांचा पोत खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे केस अगदी कोमट पाण्याने किंवा गार पाण्याने धुवायला हवेत.
४. इलेक्ट्रॉनिक उपकरणे टाळावीत
बरेचदा केसांना स्टायलिंग करण्यासाठी आपण हेअर ड्रायर, ब्लोअर, स्ट्रेटनर अशी उपकरणे वापरतो. पण या उपकरणांचा केसांवर विपरीत परीणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो फार आवश्यकता नसल्यास अशी उपकरणे टाळलेली केव्हाही जास्त चांगली.
५. घरगुती मास्कचा वापर
घरच्या घरी नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन तयार केलेले हेअर मास्क वापरणे केसांसाठी केव्हाही जास्त चांगले असते. यामध्ये कॉफी, कोरफडीचा गर, आवळ्याची पावडर, जास्वंद पावडर अशा गोष्टींचा वापर करु शकतो. त्यामुळे केस मजबूत, मुलायम होण्यास मदत होते. केसांच्या वाढीसाठी आणि केसांतील पोषण टिकून राहण्यासाठी हे फायदेशीर असते.