सौंदर्य खुलवण्यासाठी आपण सगळेच कमी अधिक फरकाने ब्युटी प्रॉडक्ट वापरतो. अगदी रोज नाही तर सणसमारंभाला किंवा लग्नाकार्याला जाताना तरी आपण नक्कीच मेकअप करतो. यामध्ये काजळ, लिपस्टीक, आयशॅडो, आयलायनर, कॉम्पॅक्ट, कन्सिलर यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो. याशिवाय थंडीच्या दिवसांत आपण मॉइश्चरायझर, बॉडी लोशन यांचाही नियमित वापर करतो. बॉडी स्प्रे, परफ्यूम यांचा वापरही अनेकदा अपरिहार्य असतो. बाजारात सध्या ब्युटी प्रॉडक्टचे बरेच ब्रँड आहेत. या ब्रँडमध्ये सतत स्पर्धा सुरू असल्याचे आपल्याला दिसते. अनेकदा वेगवेगळ्या ऑफर्स देत हे ब्रँड आपल्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. आता या गोष्टी आपण आपल्या चेहऱ्यावर लावतो खरे पण त्या विकत घेताना त्यामध्ये कोणकोणते पदार्थ वापरले आहेत हे आपण दरवेळी पाहतोच असे नाही. पण सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरण्यात आलेले काही घटक आपल्या त्वचेसाठी घातक ठरु शकतात. आता असे कोणते घटक आहेत ज्यामुळे त्वचेला अपाय होऊ शकतात पाहूया....
अल्कोहोल
परफ्यूम, अॅस्ट्रींजंट, लोशन, क्रिम, सिरम यांसारख्या गोष्टींमध्ये इथेनॉल, मिथेनॉल, इथाईल अल्कोहोल या स्वरुपात कमी अधिक फरकाने अल्कोहोल असते. जास्त प्रमाणात कॉन्सट्रेट केलेल्या गोष्टींमधील अल्कोहोलमुळे त्वचा कोरडी पडण्याची समस्या निर्माण होते. यामुळे अक्षरश: त्वचेचे पापुद्रे निघून येऊ शकतात. तसेच काही उत्पादनांमुळे त्वचेत तेलाची निर्मिती होते आणि त्यामुळे चेहऱ्यावर पुरळ येण्याची शक्यता असते. त्या तुलनेत सिटारील अल्कोहोल आणि सिटील अल्कोहोल काही प्रमाणात माइल्ड असल्याने ते आपल्या उत्पादनांमध्ये कमी प्रमाणात असलेले चालू शकते.
पॅराबेन्स
या घटकाबद्दल आपण अनेकदा ऐकून असतो. आपण वापरत असलेले ब्युटी प्रॉडक्ट दिर्घकाळ टिकावे यासाठी प्रिझर्व्हेटीव्ह म्हणून पॅराबेन्स या घटकाचा वापर केलेला असतो. आपण वापरत असलेल्या टुथपेस्टपासून ते शाम्पूपर्यंत सगळ्या उत्पादनांमध्ये पॅराबेन्स असतेच असते. फारच कमी उत्पादने अशी असतात ज्यात हा घटक वापरलेला नसण्याची शक्यता असते. या घटकाच्या जास्त वापरामुळे अॅलर्जीपासून ते कॅन्सरसारख्या गंभीर आजारापर्यंतच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. महिलांमध्ये गर्भधारणा होण्यासही या घटकामुळे अडचणी येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञ सांगतात. हा घटक आपण वापरत असलेल्या उत्पादनांमध्ये अतिशय कमी प्रमाणात असला तरी जास्तीत जास्त उत्पादने वारंवार वापरणाऱ्यांना त्याचा निश्चितच त्रास होऊ शकतो. त्यामुळे या उत्पादनांचा सातत्याने वापर करण्यापेक्षा सौंदर्य खुलवण्यासाठी काही घरगुती उपाय केले तर जास्त चांगले.
पावडर
भारतात रंग उजळवण्यासाठी, फ्रेश वाटावे म्हणून किंवा सतत घाम येतो म्हणून पावडर सर्रास वापरला जाणारा घटक आहे. या पावडरमध्ये अॅसबेस्टॉस नावाचा एक घटक असतो. अनेकदा पावडर लावताना ती हलकी असल्याने उडते आणि नाकाद्वारे आपल्या फुफ्फुसात जाते. त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आयशॅडो, ब्लश यांमध्येही हे घटक असतात. त्यामुळे या गोष्टींना कॉर्न, आरारुट, बेकींग सोडा हे पर्याय असू शकतात.
धातू
मेकअपच्या उत्पादनांमध्ये शिसं, पारा, झिंक हे धातू असतात. लिपस्टीकपासून आयलायनरपर्यंत प्रत्येक उत्पादनात हे धातू वापरलेले असतात. त्यामुळे हे धातू जास्त प्रमाणात आपल्या शरीराशी संपर्कात आल्यास कर्करोग, न्यूरॉलॉजिकल विकार, विकासात अडथळे येणे अशा तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे शिसाचा वापर असलेली उत्पादने प्रामुख्याने टाळायला हवीत. तसेच नैसर्गिक रंगाची उत्पादने वापरल्यास त्याचा जास्त फायदा होतो. आपल्या उत्पादनांचा रंग जितका वेगळा किंवा गडद तितके त्यात धातूचे प्रमाण जास्त. त्यामुळे सौंदर्यउत्पादने वापरताना योग्य ती काळजी घ्यायला हवी.
ऑक्सिबेन्झोन
प्रामुख्याने सनस्क्रीन लोशनमध्ये केमिकल फिल्टर म्हणून हा घटक वापरला जातो. हा घटक स्कीनमध्ये शोषला गेला तर त्यामुळे विविध प्रकारच्या अॅलर्जी आणि हार्मोनल तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे लहान मुलांना आणि गर्भवती महिलांना सौंदर्यउत्पादनांपासून दूर राहण्यास सांगितले जाते. मिनरल किंवा फिजिकल सनस्क्रीन लोशन वापरणे केव्हाही चांगले, कारण त्यामध्ये टिटॅनिअम डायऑक्साइड किंवा झिंक ऑक्साइड असते ज्यामुळे तुमच्या त्वचेचे सूर्यकिरणांपासून संरक्षण होते.