Join us  

लावा 5 हर्बल लेप, उन्हाळ्यातही येईल चेहेऱ्यावर चमक ; टॅनिंग घालवण्याचे घरच्याघरी सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2022 6:05 PM

केशर, दूध, साय, पपई, मध, स्ट्राॅबेरी, नारळ पाणी यांचा वापर करुन टॅनिंग घालवणारे उपाय घरघ्याघरी करता येतात. 

ठळक मुद्देपपई मधाच्या लेपानं चेहेऱ्यास क जीवनसत्वाचा फायदा होतो.स्ट्राॅबेरी आणि साय यांचा एकत्रित वापर करुन त्वचेचा पोत सुधारतो. चंदन पावडर आणि नारळाचं पाणी यांचा वापर करुन चेहेऱ्यावरचा काळपटपणा लवकर कमी होतो. 

हिवाळ्यात थंडी वाजते म्हणून जास्तीत जास्त उन्हात बसण्याचे परिणाम हिवाळ्यानंतर दिसून येतात. उन्हाळा जसा जवळ येतो तशी उन्हानं काळी पडलेली त्वचा स्पष्टपणे दिसायला लागते. त्वचेचा खराब झालेला पोतही नजरेस भरतो. त्यातच उन्हाळ्यामुळे त्वचा आणखी काळी पडण्याचा धोका असतो. यावर उपाय म्हणजे टॅनिंग कमी करणारे उपाय करणे. घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून घरघ्याघरी अवघड वाटणाऱ्या टॅनिंगवर उपाय करता येतात. पपई, मध, काकडी, स्ट्राॅबेरी, नारळ पाणी , केशर, दूध आणि चंदन पावडर यांच्याद्वारे चेहेऱ्यावरचं टॅनिंग् सहज काढून टाकता येतं. 

Image: Google

1. पपई आणि मध

पपईमध्ये त्वचा मुळापासून स्वच्छ करणारे आणि त्वचा उजळ करणारे गुणधर्म असतात.  या गुणधर्मांनी टॅनिंग दूर होवून त्वचा स्वच्छ होते. पपईमधून त्वचेस क जीवनसत्वाचा लाभ होतो. लेपामधील मधामुळे त्वचेस आर्द्रता मिळून त्वचा मऊ ओते. हानिकारक जिवाणुंपासून त्वचेचं संरक्षण होतं. मधामुळे मुरुम पुटकुळ्यांचा धोका टळतो, चेहेरा खोलवर स्वच्छ होतो.  हा लेप तयार करण्यासाठी अर्धा कप पिकलेली पपई आणि 1 चमचा मध घ्यावं. पपईच्या तुकड्यात मध घालून ते चांगलं एकजीव करावं. हा लेप चेहेऱ्यास लावावा. अर्ध्या तासानं चेहेरा थंडं पाण्यानं स्वच्छ धुवावा.

Image: Google

2. काकडी, मुल्तानी माती आणि लिंबाचा रस

त्वचेचा काळेपणा घालवण्यासाठी लिंबाचा रस प्रभावी उपाय मानला जातो. पण नुसता लिंबाचा रस चेहेऱ्यास लावला तर त्वचेस नुकसान होवू शकतं. यासाठी लिंबाच्या रसात इतर नैसर्गिक घटकांचा समावेश करुन लेप तयार करता येतो. यासाठी काकडी किसून त्याचा रस काढावा. काकडीच्या रसात 1 चमचा मुल्तानी माती, अर्धा चमचा गुलाब पाणी  आणि पाव चमचा लिंबाचा रस घालावा. तिन्ही गोष्टी एकजीव कराव्यात. हा लेप चेहेऱ्यास लावून 10-15 मिनिटं ठेवावा. लेप वाळला की चेहेरा थंडं पाण्यानं स्वच्छ धुवावा. लिंबाच्या रसानं चेहेऱ्याचा काळपटपणा कमी होतो. गुलाब पाणी, मुल्तानी माती यामुळे त्वचेस थंडावा मिळतो तर काकडीच्या रसानं चेहेऱ्यावरील सूज कमी होवून त्वचा उजळ होते. 

Image: Google

3. स्ट्राॅबेरी आणि साय

त्वचा नैसर्गिकरित्या उजळ करणारे घटक स्ट्राॅबेरीत असतात. तर दुधाच्या सायीत त्वचा माॅश्चराइज करण्याचे गुणधर्म असतात. दोन्ही एकत्र करुन त्याचा लेप चेहेऱ्यास लावला तर त्वचेचा पोत सुधारतो आणि काळेपणा कमी होतो. उन्हानं रापलेली त्वचा बरी होण्यास हा लेप मदत करतो. हा लेप तयार करण्यासाठी 2 मोठे चमचे दुधाची साय घ्यावी. त्यात एक ताजी स्ट्राॅबेरी कुस्करुन मिसळावी. साय आणि स्ट्राॅबेरी एकजीव करुन लेप चेहेऱ्यास लावावा. हा लेप अर्धा तास चेहेऱ्यावर ठेवून नंतर चेहेरा थंडं पाण्यान्ं धुवावा.

Image: Google

4. चंदन पावडर आणि नारळाचं पाणी

चंदन आणि नारळ पाण्यातील गुणधर्मांमुळे चेहेऱ्यावरील काळेपणा दूर होतो. त्वचा उजळ होण्यास, चेहेऱ्यावर ताजेपणा आणण्यास हा लेप मदत करतो. हा लेप तयार करण्यासाठी एक चमचा चंदन पावडर आणि त्यात 1 चमचा नारळाचं पाणी घालून घट्टसर पेस्ट तयार करावी. ही पेस्ट  चेहेऱ्यास लावावी. लेप वाळल्यानंतर चेहेरा थंडं पाण्यानं धुवावा. आठवड्यातून तीन वेळा हा उपाय केल्यास टॅनिंग लवकर कमी होतं. 

Image: Google

5. केशर आणि दूध

उन्हानं काळवंडलेली त्वचा उजळ करण्यासाठी ,चेहेऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी केशरचा उपयोग करणं ही पारंपरिक पध्दत आहे. यासाठी थंडं दुधात किंवा कच्च्या दुधात थोडं केशर घालावं. चेहेऱ्यावर जिथे काळपटपणा आहे किंव जिथे डाग आहे तिथे हा दूध केशर लेप लावावा. लेप 15 मिनिटं चेहेऱ्यावर वाळू द्यावा. लेप वाळला की थंडं पाण्यानं चेहेरा धुवावा.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडी