केस काळेभोर, दाट आणि लांबसडक असले की आपल्या सौंदर्यात भर पडते. पण काही ना काही कारणाने आपले केस कधी खूप गळतात, त्यामुळे पातळ होतात. कधी केसांमध्ये खूप कोंडा होतो तर कधी ते खूपच रुक्ष आणि निर्जीव होतात. केस पांढरे होणे ही समस्याही गेल्या काही वर्षात वेगाने वाढल्याचे दिसते. आपण खात असलेल्या अन्नातून शरीराचे योग्य पद्धतीने पोषण न होणे, अनुवंशिकता, वाढते ताणतणाव यांसारख्या काही गोष्टी केस पांढरे होण्याला कारणीभूत असतात. एकदा केस पांढरे व्हायला लागले की आपण नकळत वयस्कर दिसायला लागतो. ऐन तारुण्यात केस पांढरे झाले असतील तर आपल्याला तसे केस घेऊन चारचौघात जाण्याची अनेकदा लाजही वाटते (5 home remedies to deal with pre mature grey hair).
मग हे पांढरे झालेले केस काळे कसे करायचे असा प्रश्न आपल्याला पडतो. अशावेळी बाजारात मिळणारे विविध कंपन्यांचे डाय आपण केसांवर ट्राय करुन पाहतो. पण हे डाय हा तात्पुरता उपाय असून केस वाढले की ते महिन्याभरात पुन्हा पांढरे दिसायला लागतात. त्यामुळे या डायचा खर्च दिवसेंदिवस परवडेनासा होतो. इतकंच नाही तर यामध्ये वापरण्यात आलेले केमिकल्स आपल्या केसांसाठी चांगले असतातच असं नाही. त्यामुळे डाय करणे हा शेवटचा पर्याय असेल तरी घरच्या घरी काही सोप्या उपायांनी केस काळे ठेवणे शक्य आहे. हे उपाय कोणते पाहूया...
१. आवळा
रोज न चुकता सकाळी १५ मिलीग्रॅम आवळा ज्यूस १ ग्लास पाण्यात घालून प्यायला हवा. त्याचा केस काळे राहण्यासाठी नक्कीच फायदा होतो.
२. कांद्याचे तेल
कांद्याच्या बियांचे तेल किंवा कांद्याचा रस केसांना लावायला हवा. आठवड्यातून २ वेळा केसांच्या मुळांशी यापैकी एक गोष्ट लावल्यास केस काळे होण्यास मदत होते.
३. गव्हांकुराची पावडर
दिवसभरातील कोणत्याही आहारात १ चमचा गव्हांकुराची पावडर घ्यावी. किंवा सकाळी गव्हांकुराचे पाणी प्यायले तरी चालते.
४. कडीपत्ता
कडीपत्त्याची पेस्ट दह्यामध्ये कालवून ती केसांच्या मुळांशी लावायची. साधारण ३० मिनीटे तसेच ठेवून मग केस नेहमीप्रमाणे धुवावेत.
५. काळे तीळ
दिवसभरातील आहारात १ चमचा काळ्या तिळाचा समावेश केल्यास केस काळे होण्यास मदत होते.
याबरोबरच आहारात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए, सी, झिंक आणि लोह असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.