लिपस्टीक हा आपल्या मेकअपमधील एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. घराबाहेर पडताना अनेक जणींनी बाकी काही मेकअप केला नाही तरी काजळ आणि लिपस्टीक या बेसिक गोष्टी तरी आपण लावतोच. मग त्यामध्ये आपण एखादा स्पेसिफीक ब्रँडची, विशिष्ट रंगाची मॅट, लिक्विड किंवा ग्लिटरी स्वरुपाची लिपस्टीक लावतो. घाईघाईत आपण बाहेर जाताना ओठांवर ही लिपस्टीक फिरवतो आणि बाहेर जातो. मात्र लिपस्टीक म्हटल्यावर त्यामध्ये केमिकल्स असतातच. लिपस्टीक लावल्याने आपल्या सौंदर्यात भर पडत असली तरी सतत ती लावल्याने ओठ खराब होण्याचीही शक्यता असते. म्हणूनच तुम्ही सतत लिपस्टीक वापरत असाल तर काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात. प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आंचल पंथ लिपस्टीकबाबत टाळता येतील अशा काही गोष्टी सांगतात, त्या कोणत्या पाहूया (5 Lipsticks Mistakes To Avoid)...
१. गडद रंग टाळा
शक्यतो आपण काहीवेळा गडद रंगाच्या लिपस्टीक वापरतो. गडद रंगाच्या लिपस्टिकमध्ये मॅग्नेशियम, क्रोमियम, शिसे इत्यादींचे प्रमाण जास्त असते. गडद रंगाच्या लिपस्टिकचा वापर कमीत कमी करणे केव्हाही चांगले. म्हणूनच हलक्या रंगाच्या लिपस्टीक वापरणे जास्त चांगले.
२. थेट लिपस्टिक लावणे
ओठांना थेट लिपस्टीक लावणे ओठांसाठी चांगले नसते. त्यामुळे लिपस्टिक वापरण्यापूर्वी त्यावर लिप बाम किंवा सनस्क्रीनचा थर लावा. यामुळे ओठांचे रक्षण होण्यास तसेच ओठांचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होईल. यासाठी सेबामेड, मेलाल्युमिन, चापटेक्स, सनक्रोमा हे चांगले पर्याय असतात.
३. नाईट लिप केअर रुटीन
रात्री झोपताना ओठाला न चुकता लिप बाम लावायला हवे. आपण चेहऱ्याच्या त्वचेची जितकी काळजी घेतो तितकीच आपण आपल्या ओठांची घ्यायला हवी. चेहऱ्यावर आपण ज्याप्रमाणे सिरम आणि मॉईश्चरायजर लावून झोपतो त्याचप्रमाणे झोपताना ओठांना न चुकता लिप बाम लावायला हवे.
४. नेहमी लिक्विड मॅट लिपस्टीक वापरणे
काही वेळा मॅट लिपस्टीक वापरण्यापासून ब्रेक घेऊन आपण टिन्ट लिप ग्लॉसही वापरु शकतो. लिप ग्लॉसमध्ये अतिशय कमी प्रमाणात पिगमेंट असतो तसेच तो मॉईश्चरायजिंग असलेल्या पदार्थांपासून बनलेला असतो. त्यामुळे ओठ चांगले राहण्यास मदत होते.
५. लिपस्टीक लावून झोपणे टाळा
झोपताना आपण चेहऱ्यावरचा सगळा मेकअप काढतो आणि मगच झोपतो. पण लिपस्टीक काढायचे मात्र आपण विसरतो. मात्र झोपताना लिपस्टीक ओठांवर राहिली तर त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे लिपस्टीक पूर्ण साफ करुन मगच झोपायला हवे.