गौरी-गणपती म्हणजे वर्षातून एकदा येणारा मोठा सण. या निमित्ताने एकमेकांकडे आरतीला आणि दर्शनाला जायचे असेल तर आपण छान दिसायलाच हवे. सगळ्यांमध्ये उठून दिसायचे तर थोडा बेसिक मेकअप तरी हवाच. यासाठी मेकअप करताना काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. मेकअप म्हणजे काहीतरी अवघड किंवा आपल्याला न जमणारे असे याकडे न पाहता आपले सौंदर्य खुलवणारी गोष्ट म्हणून याकडे पाहायला हवे. अगदी बेसिक स्टेप्समध्ये आपण आपला लूक खुलवू शकतो. फक्त त्यासाठी काही नेमक्या गोष्टी करण्याची आवश्यकता असते. खूप जास्त मेकअपची उत्पादने लावली म्हणजे आपण छान दिसतो असे नाही. तर नेमक्या पद्धतीने आणि योग्य त्या प्रमाणात मेकअप केल्यास रुप खुलण्यास मदत होते. पाहूयात झटपट आणि सोप्या पद्धतीने मेकअप करण्याच्या काही खास स्टेप्स (5 Step Makeup tips for looking beautiful Ganpati gauri festival Special)...
1. मेकअप चेहेर्यावर नीट लागण्यासाठी आणि दिवसभर टिकावा यासाठी मेकअपची पूर्वतयारी आवश्यक असते. त्यासाठी सर्वात आधी सौम्य क्लीन्जरने चेहरा स्वच्छ करावा. क्लिंजर नसल्यास कच्च्या दुधानं चेहेर्याचं क्लीन्जिंग करावं. क्लीन्जिंग नंतर टोनिंग करावं, त्यासाठी गुलाब पाणी वापरलं तरी चालतं. यामुळे त्वचा छान सेट होते. टोनिंगनंतर चेहेर्यावर रुमालात बर्फ घेऊन तो काही सेकंद फिरवावा. यामुळे चेहेर्याची त्वचा घट्ट होते आणि मेकअपही दीर्घकाळ टिकण्यास मदत होते.
2. चेहेर्याला मॉश्चरायझर अवश्य लावावं, यामुळे चेहेर्यावर ओलसरपणा राहील आणि मेकअप चांगला टिकण्यास मदत होईल. मॉश्चरायजर न लावता मेकअप केला तर काही वेळातच चेहेरा कोरडा पडतो.
3. चेहेरा चांगला दिसण्यासाठी चेहऱ्याला फाउंडेशन लावणं आवश्यक आहे. यामुळे चेहेर्याची त्वचा मऊ होते आणि मेकअप केल्यावरही ती एकसारखी दिसण्यास मदत होते. त्यानंतर चेहऱ्यावरचे डाग झाकण्यासाठी चेहऱ्याला कन्सीलर लावावं. हे लावताना डॉट- डॉट करुन लावावं आणि नंतर स्पंजने पसरावे. यानंतर प्रायमर लावल्यास मेकअप चेहऱ्यावर बराच काळ टिकून राहण्यास मदत होते.
4. डोळ्यांच्या बेसिक मेकअपनेही लूकला छान उठाव येतो. डोळ्यांच्या मेकअपसाठी आयशॅडो, काजळ आणि मस्कारा एवढंच पुरेसं आहे. लिक्विड काजळाऐवजी पेन्सिल काजळ वापरावं. तसेच लवकर पसरणार नाही अशा काजळाची निवड करावी. हल्ली वेगवेगळ्या रंगाचेही काजळ बाजारात मिळतात, तेही छान लूक देतात.
5. आपण ज्या रंगाची साडी किंवा ड्रेस घालणार आहोत त्याला मॅच होईल अशी लिपस्टिक लावावी. लिपस्टिक उठावदार दिसण्यासाठी ती लावण्याआधी लिप लायनर लावावे. लिपस्टीक लावताना आधी लिप बाम लावल्यास ओठ लवकर कोरडे पडत नाहीत.