आपली त्वचा कायम नितळ आणि सतेज असावी असं प्रत्येकीला वाटतं. मात्र काही ना काही कारणांनी चेहऱ्यावर पिंपल्स येणे, फोड येणे, काळे डाग पडणे किंवा चेहरा कोरडा होणे अशा समस्या उद्भवतातच. काहीच नाही तर कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्य़ा दिसायला लागतात किंवा अनावश्यक केसांची वाढ होते. अनेकदा यातील बहुतांश गोष्टी या अनुवंशिक, पोटाच्या तक्रारींशी निगडीत असतात. तर काही वेळा आपली जीवनशैली, आपण वापरत असलेली उत्पादने यांच्याशी निगडीत असतात. मात्र बरेचदा आपण जो आहार घेतो तो आपल्या पोटाच्या तसेच त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्वचा चांगला राहावी यासाठी आहारातून कोणत्या गोष्टी बाद कराव्यात याविषयी समजून घेऊया (5 Unhealthy food for Skin Stop Eating Them Immediately)...
१. तळलेले पदार्थ
आपल्यापैकी सगळ्यांनाच गरमागरम वडे, सामोसे, पापड, पुऱ्या अशा सगळ्या गोष्टी मनापासून आवडतात. अनेकदा तर आपल्य़ाला तेलकट गोष्टींचे नाव काढले तरी तोंडाला पाणी सुटते. मात्र हे तेलकट पदार्थ योग्य त्या प्रमाणात खाल्ले तर ठिक आहे. पण प्रमाणापेक्षा जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्यास हे पदार्थ त्वचेसाठी दुष्मनाप्रमाणे काम करतात. तेलकट पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यास चेहऱ्यावर पिंपल्सचे प्रमाण वाढते. ज्यांची त्वचा ऑयली आहे त्यांच्यासाठी तर अशाप्रकारचे पदार्थ अतिशय घातक असतात.
२. फास्ट फूड
बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, वेगवेगळ्या प्रकारचे रोल हे जिभेला अतिशय चविष्ट लागतात. मात्र त्वचेसाठी हे पदार्थ अजिबात चांगले नसतात. या पदार्थांमध्ये कॅलरीज, फॅटस आणि रिफाईंड कार्बोहायड्रेटस यांचे प्रमाण जास्त असते. हे घटक त्वचेसाठी अपायकारक असल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येणे, त्वचा डल दिसणे अशा समस्या यामुळे निर्माण होतात.
३. मसालेदार पदार्थ
आपल्याला अनेकदा मिसळ, पावभाजी, मांसाहारी पदार्थ खाण्याची इच्छा होते. या पदार्थांमध्ये झटका असल्याने ते चविष्ट लागतात. पण हे पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खाल्ले तर त्वचेच्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे अशाप्रकारच्या भाज्या खाव्यात ज्यामध्ये कमीत कमी मसाले किंवा मिरची घातली तरी त्या चविष्ट होतील.
४. चॉकलेट
लहन मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्य़ांनाच चॉकलेट अतिशय फेवरिट असते. चॉकलेटमध्ये असलेली साखर आणि कार्बोहायड्रेटस कोलेजन हार्ड करतात. त्यामुळे त्वचेतील सीबमची निर्मिती वाढते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्यांचे प्रमाणही वाढते. त्यामुळे तुम्हाला खायचेच असेल तर डार्क चॉकलेट खा आणि त्याचे प्रमाणही नियंत्रणात ठेवा.
५. कोल्ड ड्रिंक्स आणि अल्कोहोल
त्वचेमध्ये आर्द्रता चांगली असेल तर त्वचा ग्लोईंग दिसण्यास मदत होते. मात्र त्वचेतील आर्द्रता कमी झाल्यास त्वचा कोरडी आणि उदास दिसते. कोल्ड ड्रिंक्स आणि अल्कोहोलमुळे शरीर तर डिहायड्रेट होतेच पण त्वचाही डिहायड्रेट होते. तसेच या दोन्ही गोष्टींमुळे आपण लवकर वयस्कर दिसायला लागतो.