Join us  

5 प्रकारे चेहरा आणि केसांना लावा दही, त्वचा आणि केस सुंदर करणारा खास 'कर्ड टच'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 6:31 PM

सौंदर्य तज्ज्ञ म्हणतात त्वचा निरोगी ठेवून सुंदर करण्याचा उपाय ना महाग आहे ,ना वेळखाऊ. दह्याचा वापर करुन त्वचेची आणि केसांची काळजी घेणं सहज शक्य आहे.

ठळक मुद्देदह्यातील ड जीवनसत्त्वामुळे त्वचा तरुण राहाते.दह्यामधील गुणधर्मांमुळे त्वचेत ओलावा निर्माण होतो.केसांचा पोत सुधारण्यासाठी तसेच कोड्यांसारखा समस्या घालवण्यासाठी दह्याच्या हेअर पॅकचा उपयोग होतो.

त्वचा आणि केसांच्या सौंदर्याच्या समस्या सतत सतावत असतात. त्वचा आणि केस चांगले ठेवण्यासाठी कायु करता येईल याबाबतचे अनेक उपाय सांगितले जातात. पण दोन्हींसाठी वेगवेगळ्या गोष्टी वापरुन उपाय करायला हातात तेवढा वेळ नसतो . पण तज्ज्ञ म्हणतात की त्वचेची आणि केसांची काळजी घेतल्यास समस्या निर्माण होत नाही आणि जरी निर्माण झाल्या तरी त्या पटकन सोडवता येतात. सौंदर्य तज्ज्ञ म्हणतात, की त्वचा निरोगी ठेवून सुंदर करण्याचा उपाय ना महाग आहे ,ना वेळखाऊ. दह्याचा वापर करुन त्वचेची आणि केसांची काळजी घेणं सहज शक्य आहे. त्वचेला आणि केसांना दही लावण्याचे 5 प्रकार आहेत. या प्रकारांनी दह्याचा समावेश आपल्या सौंदर्योपचारात केला तर त्वचेच्या आणि केसांच्या अनेक समस्या सहज सुटतात. 

Image: Google

त्वचेसाठी दही लाभदायक कसं?

त्वचेला उत्तम पोषण दिल्यास त्वचा निरोगी राहाते आणि सुंदरही होते. दह्यात कॅल्शियम, प्रथिनं, जीवनसत्त्वं, खनिजं असतात. दह्यात ड जीवनसत्त्वभरपूर प्रमाणात असतं. ड जीवनसत्त्वामुळे त्वचा तरुण राहाते. दह्यात लॅक्टिक ॲसिड असतं. लॅक्टिक ॲसिडमुळे मृत त्वचा निघून जाते. तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि वाढत्या वयाची लक्षणं घालवण्यासाठी दह्यातील लॅक्टिक ॲसिड उपयोगी ठरतं. त्वचा ओलसर ठेवण्यास, मऊ मुलायम होण्यास दह्यातील घटक त्वचेची मदत करतात. त्वचेचा आणि केसांचा पोतही दह्याच्या वापरानं सुधारतो.  त्वचा आणि केसांच्या समस्यांचं स्वरुप बघून दह्याचा वापर कसा करायचा हे ठरतं. 

Image: Google

सौंदर्योपचारात दह्याचा उपयोग कसा कराल?

1. दह्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात. डाग घालवण्यासाठी घरी विरजलेलं ताजं दही घ्यावं. चेहऱ्यावर जिथे काळे डाग आहे तिथे दही लावावं. डोळ्यांखाली काळी वर्तुळं असल्यास तिथेही दही लावावं. दही लावल्यानंतर 10-15 मिनिटांनी चेहरा थंड पाण्यानं धुवावा. चेहऱ्यावरचे काळे डाग जाईपर्यंत हा उपाय रोज करावा असं सौंदर्य तज्ज्ञ सांगतात. 

2. दह्यामध्ये जीवाणूविरोधी, दाह आणि सूज विरोधी गुणधर्म असतात. एका वाटीत थोडं दही घ्यावं. त्यात थोडी हळद घालून दही चांगलं बोटानं किंवा चमच्यानं फेटून घ्यावं. दह्याचा हा लेप चेहऱ्यास लावावा. यामुळे चेहऱ्यावर मुरुम पुटकुळ्या असल्यास त्याची तीव्रता कमी होते. मुरुम पुटकुळ्या गेल्यानंतरही चेहऱ्यावर जिथे जिथे मुरुम पुटकुळ्या येतात तिथे हा दह्याचा लेप लावल्यास पुढे मुरुम पुटकुळ्या येण्यास अटकाव होवून त्वचा मऊ मुलायम राहाते.

Image: Google

3. त्वचा ओलसर राहिली, त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकून राहिल्यास त्वचा सुंदर राहाते. दह्यामधील गुणधर्मांमुळे त्वचेत ओलावा निर्माण होतो. चेहऱ्याला रोज दही लावल्यास त्वचा मऊ होते. एका वाटीत थोडं दही घ्यावं. त्यात थोडं मध घालून दही नीट फेटून घ्यावं. हा लेप चेहऱ्याला लावून 15-20 मिनिटं ठेवावा. नंतर चेहरा थंडं पाण्यानं धुवावा.

4. उन्हामुळे त्वचा खराब होते. सुर्याच्या अति नील किरणांपासून दही त्वचेचं संरक्षण करु शकतं. सनबर्नमुळे चेहरा निस्तेज आणि त्वचा ताणलेली दिसते. तसेच चेहरा काळवंडून चेहऱ्यावर काळे डागही पडतात. हे घालवण्यासाठी आणि त्वचेचं सुर्याच्या अति नील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी दही प्रभावी ठरतं. दह्यात झिंक असतं तसेच सूज आणि दाहविरोधी घटक असल्यानं दह्याचा वापर करुन सनबर्न पासून त्वचेचं संरक्षण करता येतं आणि सनबर्नमुळे निर्माण होणाऱ्या समस्याही सुटतात. यासठी एका वाटेत थोडं दही घ्यावं.  ते थोडं फेटून चेहऱ्याला लावावं. 15-20 मिनिटांनी चेहरा थंड पाण्यानं धुवून चेहऱ्याला माॅश्चरायझर लावावं.

Image: Google

5. केसांचा पोत सुधारण्यासाठी तसेच कोड्यांसारखा समस्या घालवण्यासाठी दह्याच्या हेअर पॅकचा उपयोग होतो. यासाठी एका भांड्यात दही घ्यावं. त्यात एक अंडं फोडून घालावं. दह्यात ते चांगलं मिसळून त्याची घट्ट पेस्ट तयार करावी. ही पेस्ट केसांना लावावी. 15-20 मिनिटांनी केस पाण्यानं स्वच्छ धुवावेत. अंडं न मिसळता नुसतं दही केसांना लावल्यास केसातील कोंडा निघून जातो. केस नैसर्गिकरित्या कंडिशनिंग करण्याची क्षमता दह्यामध्ये असते. दह्यामुळे केसांच्या समस्या सुटतात. केसांचं पोषण होवून केसांचा पोत चांगला होवून् केस मऊ मुलायम होतात. केसांची चमक वाढते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी