ऋतू कोणताही असो त्वचेच्या निगडित समस्यांचा सामना करावाच लागतो. ऋतू, वातावरण, प्रदूषण यांचा परिणाम त्वचेवर होतोच. पण त्यापेक्षाही त्वचेवर जास्त परिणाम चुकीच्या पध्दतीनं त्वचेची काळजी घेणं, ब्यूटी प्रोडक्टसचा अति वापर करणं यामुळे होतात. आयुर्वेदानुसार त्वचेची योग्य काळजी घेतल्यास त्वचा सुंदर दिसण्यासाठीचे प्रोडक्टस अति प्रमाणात वापरण्याची गरज नसते. आयुर्वेदात त्वचेच्या समस्यांचा, त्वचेची काळजी घेण्याचा विचार हा प्रकृतीनुसार करायला हवा असं सांगितलं आहे. आयुर्वेदात वात, पित्त, कफ या तीन प्रकृती सांगितलेल्या आहेत. वात प्रकृती असलेल्यांची त्वचा कोरडी, संवेदनशील असते. वात प्रकृतीच्या व्यक्तींच्या त्वचेवर लवकर सुरकुत्या पडतात. पित्त प्रकृतीच्या लोकांच्या त्वचेवर चट्टे, मुरुम पुटकुळ्या, लालसर व्रण दिसतात. तर कफ प्रकृतीच्या लोकांची त्वचा तेलकट असते. ब्लॅकहेडस , चेहऱ्यावर खड्डे ( ओपन पोर्स) या समस्या जास्त प्रमाणात दिसतात.
Image: Google
आयुर्वेदानुसार त्वचेच्या समस्या प्रकृतीनुसार वेगवेगळ्या असल्या तरीही त्वचेची काळजी घेण्याचे काही नियम पाळल्यास, मुद्दाम काही नैसर्गिक घटकांचा उपयोग करत उपाय केल्यास त्याचा त्वचेस फायदा होतो. त्वचेच्या समस्या निर्माण होत नाही. त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर ठेवण्यासाठी त्वचेची आधीच योग्य काळजी घेण्याला आयुर्वेदात जास्त महत्व दिलं आहे.
Image: Google
त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर करण्यासाठी
1. त्वचेची काळजी घेण्याचा पहिला उपाय म्हणजे त्वचा रोज नीट स्वच्छ करणं. आयुर्वेदात त्वचा स्वच्छ करण्यासाठी कच्चं दूध वापरण्याचा सल्ला दिला आहे. कच्च्या दुधामुळे त्वचेवरची सर्व घाण काढून टाकली जाते. कच्च्या दुधामुळे त्वचेला आर्द्रता मिळते. कच्च्या दुधामुळे त्वचेची आग होत असल्यास् ती थांबते. यासाठी सकाळी एका वाटीत कच्चं दूध घ्यावं. हे दूध कापसाच्या बोळ्यानं चेहेऱ्यास लावावं. थोडा वेळ ते तसंच चेहेऱ्यावर राहू द्यावं.
Image: Google
2. कच्चं दूध लावून चेहरा स्वच्छ केल्यावर चेहऱ्यावर कापसाच्या बोळ्यानं गुलाबपाणी लावावं. यामुळे त्वचा टोन होते. त्वचा नैसर्गिकरित्य मऊ होण्यास , उजळ होण्यास गुलाबपाण्याचा उपयोग होतो. गुलाबपाणी एका स्प्रे बाॅटलमध्ये भरुन ते चेहरा कच्च्या दुधानं स्वच्छ केल्यावर फवारल्यास त्वचा ताजी तवानी होते. त्वचेला ओलसरापणा मिळून त्वचा मऊ होते.
Image: Google
3. त्वचा कोरडी असो, तेलकट किंवा मिश्र.. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी क्लीन्जिंग आणि टोनिंगसोबत माॅश्चरायझिंग ही प्रक्रिया देखील महत्त्वाची असते. आयुर्वेदात त्वचा माॅश्चरईज करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा उपयोग करण्याचा सल्ला दिला जातो. खोबऱ्याच्या तेलानं त्वचा आर्द्र होते. त्वचेवरील डाग निघून जातात. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी माॅश्चरायझर म्हणून खोबऱ्याच्या तेलाचा उपयोग फायदेशीर असतो. यासाठी हातावर थोडं खोबऱ्याचं तेल घेऊन ते हलका मसाज करत चेहरा आणि मानेल लावावं.
Image: Google
4. आठवड्यातून, पंधरवाड्यातून एकदा त्वचा खोलवर स्वच्छ करणं, एक्सफोलिएट करणं महत्त्वाचं असतं. यासाठी आयुर्वेद साखरेचा उपयोग करण्यास सांगतं. चेहरा पाण्यानं ओला करावा. हातावर थोडी साखर घेऊन त्याने चेहऱ्यास हलक्या हातानं मसाज करावा. साखरेमुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते.
Image: Google
5. मुरुम पुटकुळ्या, त्यामुळे त्वचेवर आलेली सूज घालवण्यासाठी कडूलिंबाच्या तेलाचा उपयोग होतो. नीम तेलामुळे मुरुम पुटकुळ्यांची समस्या मुळापासून निघून जाते. नीम तेलाचा वापर त्वचेवर रात्री झोपताना करावा. रात्री झोपण्यापूर्वी हातावर नीम तेलाचे थेंब घेऊन त्याने चेहऱ्यास हलका मसाज करावा. रात्रभर तेल चेहऱ्यावर राहू द्यावं.
Image: Google
6. आयुर्वेदात त्वचेची काळजी घेण्यासाठी कोरफडीला विशेष महत्व आहे. रोजच्या आहारात कोरफडीचा समावेश केल्यास तसेच कोरफड जेल चेहऱ्यावर लावल्यास त्वचा मुलायम आणि चमकदार होते. समस्या निर्माण झाल्यावर उपाय करण्यापेक्षा आधीच त्वचेची योग्य प्रकारे, नैसर्गिक घटकांचा उपयोग करत काळजी घेतल्यास कृत्रीम सौंदर्य घटकांचा वापर करण्याची गरज कमी होते.