Join us  

पार्लरमध्ये जाऊन महागडे पेडिक्युअर कशाला? घरच्याघरी फक्त १५ मिनिटांत ६ स्टेप्समध्ये करा पेडिक्युअर, पाय दिसतील सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2023 11:53 AM

6 Easy Steps To Give Yourself A Salon-Like Pedicure At Home : पेडिक्युअरवर पैसे खर्च करणं जीवावर येतं, त्यासाठीच हा घरच्याघरी पेडिक्युअरचा सोपा उपाय

आपल्या चेहेऱ्याप्रमाणेच हाता - पायांची सुंदरता देखील सगळ्यांत उठून दिसावी असे प्रत्येकालाच वाटत असते. दिवसभारातील कामकामांमध्ये आपल्या हाता पायांचा सर्वाधिक उपयोग होत असतो. त्यामुळे त्यांची तितकीच जास्त काळजी घेणे महत्वाचे ठरते. चेहऱ्याप्रमाणेच स्वच्छ आणि सुंदर दिसणारे हात - पाय आपले सौंदर्य अधिकच वाढवतात. हाता - पायांची काळजी घेण्यासाठी मेनिक्युअर व पेडिक्युअर करणे हा उत्तम पर्याय आहे. पेडिक्युअर ही एक कॉस्मेटिक ब्यूटी ट्रिटमेंट् आहे. ज्यामुळे स्किनवरील धुळ-माती आणि डेड स्किन हटवण्यासह पायांचे आरोग्य कायम टिकून राहण्यास मदत करते. याचा वापर करुन महिला आपल्या पायांचे सौंदर्य वाढविण्यावर अधिक भर देतात.

आपल्यापैकी बरेचजण मेनिक्युअर व पेडिक्युअर करण्यासाठी बहुतेकदा पार्लरमध्ये जातात. मात्र पार्लरमध्ये, या सगळ्या ब्यूटी ट्रिटमेंट्ससाठी खूप जास्त पैसे आकारले जातात. परंतु आता पेडिक्युअर करण्यासाठी आपल्याला नेहमीच पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. आपण अगदी कमी वेळात घरच्या घरी पेडिक्युअर सोप्या पद्धतीने करु शकता. घरच्या घरी पेडिक्युअर करण्याची सोपी पद्धत पाहूयात(6 Easy Steps To Give Yourself A Salon-Like Pedicure At Home).

 सोप्या पद्धतीने घरच्या घरी पेडिक्युअर कसे करावे ? 

स्टेप १ :- जुनी नेलपॉलिश काढून नखे व्यवस्थित स्वच्छ करुन घ्यावीत. 

पेडिक्युअर करण्यापूर्वी नखांना लावेली आधीची जुनी नेलपॉलिश काढा. त्यासाठी कॉटन बॉलवर नेल पॉलिश रिमूव्हर घेऊन हळूहळू ते नखांना लावा. पूर्णपणे नखं स्वच्छ करा.

स्टेप २ :- नखांना ट्रिम आणि फाइल करा. 

नखं स्वच्छ केल्यानंतर जास्तीत जास्त मोठी झालेली नखं कापा. नखं बाजूने एकदम लहान कापू नका त्यामुळे तुम्हाला दुखणे सुरु होईल. नखांना खास शेप सुद्धा देऊ शकता. नखं कापल्यानंतर नेल फाइलनरने हळूहळू नखं फाइल करत शेप द्या.

स्टेप ३ :- पाय पाण्यांत भिजवा. 

नखं कापल्यानंतर आणि त्यांना शेप दिल्यानंतर आपले पाय हलक्या गरम पाण्यात बुडवून ठेवा. या पाण्यात एप्सम सॉल्ट किंवा शॅम्पू, लिंबाच्या रसाचे काही थेंब घालावे. कमीतकमी आपले पाय १५ मिनिटे यामध्ये बुडवून ठेवा आणि नंतर टॉवेलने स्वच्छ पुसून घ्यावेत. आपण आपल्या पायांच्या नखांवर मॉइश्चरायझर क्रिम लावून मसाज करू शकता. मसाज करुन झाल्यानंतर पाय पाण्यांत बुडवून ठेवा. या पाण्यांत आपण मध आणि लिंबाच्या साली देखील घालू शकता. लिंबामुळे टॅन झालेली स्किन निघण्यास मदत होईल तसेच मधामुळे पाय मॉइश्चराइज होण्यास मदत होईल. 

स्टेप ४ :- पायांना स्क्रब करा. 

पायाची स्किन आणि नखे मऊ झाल्यावर ब्रशच्या मदतीने नखे स्वच्छ करा. त्यानंतर टाचांवरची डेड स्किन काढण्यासाठी प्युमिस स्टोन वापरा. नखे स्वच्छ करण्यासाठी घरात पडलेला जुना टूथब्रश वापरा. त्यावर थोडा शाम्पू लावा आणि त्याने नखं हळुहळु हलक्या हाताने घासा. तीन-चार मिनिटांपर्यंत पायांचे तळवे आणि पायांच्या बोटांजवळ हळूहळू स्क्रब करा.

स्टेप ५ :-  पायांना मॉइश्चराइज करा. 

आता पाय स्वच्छ झाल्यानंतर त्यांना मॉइश्चराइज करणे खूपच गरजेचे असते. एका उत्तम मॉइश्चरायझरची निवड करून ते व्यवस्थित पायांना लावून घ्या.  जवळजवळ १० मिनिटे पायांना, बोटांना मॉइश्चरायझरने हलक्या स्वरुपात मसाज करा. पायांना मॉइश्चराइज करण्यासाठी आपण मॉइश्चरायझरप्रमाणेच नारळाच्या किंवा इतर तेलांचा देखील वापर करु शकतो. त्यानंतर पायावर गरम टॉवेल गुंडाळून ५ मिनिटे ठेवा आणि नंतर अतिरिक्त तेल पुसून टाका.

जेल मेनिक्युअर-पेडिक्युअर करणं आरोग्यासाठी घातक, कॅन्सरचा धोका, तज्ज्ञ सांगतात...

स्टेप ६ :- नखांना आपले आवडते नेलपॉलिश लावा. 

पायांना मॉइश्चराइज केल्यानंतर नखांना आपल्या आवडीची नेलपॉलिश लावा.

अशा पद्धतीने आपण घरच्या घरी पेडिक्युअर करु शकता.

टॅग्स :ब्यूटी टिप्स