Join us  

सतत केस गळाल्याने पातळ झाले? करा फक्त ६ गोष्टी, अजिबात गळणार नाहीत केस...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2023 4:11 PM

6 Ways to Prevent Hair fall and have Healthy Hair : केस छान लांब आणि दाट असले की सौंदर्यात नक्कीच भर पडते...

केस गळणे ही सर्वच वयोगटातील स्त्री आणि पुरुषांमध्ये असणारी एक महत्त्वाची समस्या आहे. केसांची मुळे कमकुवत झाल्याने केस गळण्याच्या समस्येत गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढ झाली आहे. आपण खात असलेल्या अन्नातून केसांचे पुरेसे पोषण न होणे, वाढते प्रदूषण, ताणतणाव आणि आरोग्याच्या इतर समस्या यांमुळे केसगळतीची समस्या वाढली आहे. काहीवेळा केसांचे गळणे इतके वाढलेले असते की केसांत नुसता कंगवा किंवा हात घातला तरी केसांचा पुंजका हातात येतो. असे झाले की केस पातळ तर होतातच पण केसांची मुळे दिसल्याने टक्कलही दिसायला लागते. पण असे होऊ नये म्हणून केसांची योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्यक असते. पाहूयात केस गळू नयेत म्हणून नेमके कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे (6 Ways to Prevent Hair fall and have Healthy Hair)...

१. आपण थंडीत बहुतांश वेळा खूप गरम पाण्याने आंघोळ करतो आणि केस धुण्यासाठीही तशाच पाण्याचा वापर करतो. पण असे न करता गार किंवा कोमट पाण्याने केस धुवायला हवेत. 

२. केस गळू नयेत म्हणून आहारात प्रथिनांचा समावेश वाढवावा. यामध्ये पनीर, अंडी, डाळी, बिया, सुकामेवा, पालक, रताळी, गाजर याचा वापर वाढवायला हवा. 

३. शरीरात लोहाची कमतरता असणे हे केस गळतीचे आणखी एक महत्त्वाचे कारण असते. त्यामुळे लोह मिळेल अशा घटकांचा आहारात समावेश करायला हवा. तसेच वेळोवेळी लोहाची पातळी तपासायला हवी.

४. केसांच्या मुळांशी आठवड्यातून एकदा कांद्याचा रस आणि आठवड्यातून २ ते ३ वेळा कोरफडीचा गर लावावा. यामुळे केसांची मुळे पक्की होण्यास मदत होते. 

५. डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊन बायोटीन ट्रिटमेंट घ्यायला हवी. त्याचा केसगळती कमी होण्यासाठी अतिशय चांगला फायदा होतो. 

६. योगा हा आरोग्याच्या विविध समस्यांवरील उत्तम उपाय असून योगासनांमुळे केसगळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी