त्वचा सुंदर, मऊ-मुलायम आणि चमकदार दिसण्यासाठी ब्यूटी प्रोडक्टस आणि ब्यूटी ट्रीटमेण्टसचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. पण डाएटचा आणि सौंदर्याचा जवळचा संबंध असतो. पण सौंदर्यासाठी डाएटचा गांभिर्याने अजूनही होत नाही. सौंदर्यतज्ज्ञ म्हणतात, की उत्तम आरोग्याचा उपाय जसा आहारात असतो तसाच नैसर्गिक सौंदर्याचा उपाय हा देखील आहारातच असतो. आहाराद्वारे त्वचेच्या सौंदर्यासाठी आवश्यक गुणधर्म मिळाल्यास त्वचा सुंदर होते. त्यासाठी फळं आणि भाज्यांचा चांगला उपयोग होतो. उन्हाळ्यात द्राक्षं मिळतात. पिवळे, काळे आणि लाल द्राक्षांचे प्रकार आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
Image: Google
द्राक्षांमध्ये लाल द्राक्षांचा फायदा विशेषकरुन त्वचेसाठी होतो. त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर आणि तरुण करण्याची क्षमता लाल द्राक्षांमध्ये असते. पिवळ्या आणि काळ्या द्राक्षांच्या तुलनेत लाल द्राक्षं जास्त रसदार असतात. लाल द्राक्षांमध्ये क, ॲण्टिऑक्सिडण्टस आणि ई जीवनसत्वं जास्त प्रमाणात असतात. हे तिन्ही घटक त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
Image: Google
लाल द्राक्षांचे सौंदर्य फायदे
1.लाल द्राक्षांमध्ये ॲण्टिऑक्सिडण्टस भरपूर असतात. आहारात ॲण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण चांगलं असल्यास ते ॲण्टि एजिंगसाठी फायदेशीर ठरतं. लाल द्राक्षं खाऊन एजिंगची लक्षणं कमी करता येतात.
2. त्वचेला सनबर्नपासून वाचवणारा पाॅलिफिनाॅल हा घटक लाल द्राक्षांमध्ये असतो. लाल द्राक्षांमधील घटक सुर्याच्या अति नील किरणांपासून त्वचेचं संरक्षण करण्यास सक्षम असतात.
3. लाल द्राक्षांमध्ये रेस्वेराट्रोल हा घटक असतो. वाढत्या वयाचा चेहेऱ्यावर दिसणारे परिणाम कमी करण्यासाठी रेस्वेराट्रोल या घटकाचा फायदा होतो. रेस्वेराट्रोल हे एक प्रकारचं ॲण्टिऑक्सिडण्ट असतं. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी हे ॲण्टिऑक्सिडेण्ट महत्वाचं असतं.
4. लाल द्राक्षांमधील ई व्हिटॅमिनचा उपयोग त्वचा चमकदार होण्यासाठी होतो. त्वचा उजळ आणि चमकदार करण्यासाठी लाल द्राक्षं खाण्याला महत्व आहे.
Image: Google
5. जिवाणु आणि संक्रमणविरोधी गुणधर्म लाल द्राक्षांमध्ये असतात. त्वचेचं हानिकारक घटकांपासून संरक्षण करण्यासाठी लाल द्राक्षं खायला हवीत असं तज्ज्ञ सांगतात.
6. त्वचेला पुरेसं क जीवनसत्व मिळाले तर त्वचा सुंदर होते. लाल द्राक्षं खाल्ल्याने त्वचा सुंदर होते कारण लाल द्राक्षांमध्ये क जीवनसत्वाचं प्रमान भरपूर असतं. लाल द्राक्षं खाल्ल्याने त्वचेखाली कोलॅजनची निर्मिती होण्यास चालना मिळते.
7. चेहऱ्यावरील डाग, चट्टे घालवण्यासाठी लाल द्राक्षं खाण्याने फायदा होतो. ऑक्सिडेटिव्ह ताणामुळे त्वचेच्या पेशींचं नुकसान होवून त्वचा रोग होतात. लाल द्राक्षं खाल्ल्यानं ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होवून त्वचेच्या पेशींचं संरक्षण होतं. त्वचेच्या समस्यांचा धोका टळतो.
Image: Google
लाल द्राक्षांचा लेप
लाल द्राक्षं खाल्ल्याने त्वचेस फायदे होतात. तसेच लाल द्राक्षं लेप स्वरुपात चेहऱ्यासाठी वापरल्यास त्याची जास्त परिणामकारकता दिसून येते. लाल द्राक्षांचा लेप तयार करण्यासाठी पिकलेला टमाटा आणि 5-6 लाल द्राक्षं घ्यावीत/ लेप लावण्याआधी चेहरा चांगला धुवून घ्यावा. एका वाटीत टमाटा आणि लाल द्राक्षं एकत्र कुस्करावीत. मग हे मिश्रण चेहरा आणि मानेस लावावे. हा लेप चेहऱ्यावर 20 मिनिटं ठेवावा. नंतर चेहरा गार पाण्यानं स्वच्छ धुवावा. लाल द्राक्षांचा लेप लावल्यानं चेहऱ्यावरील डाग निघून जातात तसेच त्वचेचं सूर्याच्या अति नील किरणांपासूनही संरक्षण होतं.